एनआयआरएफ मानांकनात पुणे विद्यापीठ मोठ्या प्रमाणात घसरले.
खासगी विद्यापीठांनी उन्नती दाखवून चांगली झेप घेतली.
विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तज्ज्ञांनी शैक्षणिक गुणवत्ता व संशोधन वाढवण्याचा सल्ला दिला.
Savitribai Phule University: पुणे शहर विद्येचं माहेर घर आहे. उच्च दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर येथे येतात. मात्र याचं पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे. देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाची प्रतिष्ठित एनआयआरएफ (National Institutional Ranking Framework) यादी जाहीर झाली आहे. गतवर्षी अव्वल २५ मध्ये स्थान मिळविणारे हे विद्यापीठ यंदा विद्यापीठ गटात ५६व्या क्रमांकावर घसरले आहे. तर सर्वसाधारण गटातही मोठी घसरण नोंदली गेली असून गतवर्षी ३७व्या स्थानी असलेले पुणे विद्यापीठ यंदा थेट ९१व्या स्थानावर गेले आहे.
पुणे विद्यापीठाचे हे मानांकनातील घसरण चिंतेचा विषय ठरत आहे. एकेकाळी ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विद्यापीठाची ओळख देशातील अग्रगण्य संस्थांपैकी एक अशी होती. मात्र, मागील काही वर्षांपासून शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन कार्य, पायाभूत सुविधा, विद्यार्थी-शिक्षक प्रमाण यांसारख्या बाबींमध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे त्याच्या स्थानावर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
याउलट, पुण्यातील खासगी विद्यापीठांनी मात्र आपली कामगिरी सुधारली आहे. सिंबायोसिस विद्यापीठाने यंदा विद्यापीठ गटात देशभरात २४ वे स्थान मिळवले असून, मागील वर्षीच्या मानांकनापेक्षा ही उन्नती मानली जाते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने देखील चांगली झेप घेत ४१ वे स्थान मिळवले आहे. तर भारती विद्यापीठाचा समावेश देशातील अव्वल ६० विद्यापीठांमध्ये झाला असून, त्याने ५९ वे स्थान पटकावले आहे.
यंदा एनआयआरएफ रॅंकिंगमध्ये देशभरातील विद्यापीठ, महाविद्यालय, संशोधन संस्था, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, मेडिकल, डेंटल, विधी, कृषी अशा विविध गटांत पहिल्या १०० संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार पुणे शहरातून चार विद्यापीठांनी स्थान मिळवले असले तरी सर्वात जुने व नामांकित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मागे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांमध्येही या निकालामुळे नाराजीचे वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.