
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश तात्याबा वाघ यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर असून त्याला भरीस घालणारी मोहिनी वाघच असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. अक्षय आणि मोहिनी यांनी सतीश यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपपत्रातून समोर आला आहे. लष्कर न्यायालयात नुकताच एक हजार पानांचे दोषारोपपत्र गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले.
अक्षय आणि मोहिनीसह अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल झाले आहे. सतीश वाघ यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अपहरण करून अवघ्या १५ मिनिटांतच तब्बल ७२ वार करून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला. सतीश वाघ यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य पाहता हा तपास पुढे हडपसर पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
या हत्याकांड प्रकरणात सतीश वाघ यांच्या सुपारीचे सर्व पैसे अक्षयने दिले असल्याची धक्कादायक माहिती देखील उघड झाली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येसाठी ५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सुपारीतील एकही रुपया मोहिनीने दिला नाही. अक्षयने स्वत:कडे असणारे दीड लाख रुपये सुरुवातीला अॅडव्हान्स म्हणून शर्माच्या बँक खात्यावर पाठवले. शर्मा आणि त्याच्या साथीदारांनी सतीश यांची हत्या केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी सव्वातीनच्या सुमारास अक्षयने राहिलेले ३ लाख रुपये शर्माला त्याच्या वाघोली येथील घरी जाऊन दिले. याबाबतचे फोटो तपासदरम्यान पोलिसांच्या हाती लागले आहेत.
सतीश वाघ यांचा पाय तोडून त्यांना एका जागेवर बसवायचे किंवा त्यांचा खून करून वाटेतून कायमचे दूर करायचे असा आरोपींचा प्लान होता. एकदा का सतीश यांचा बंदोबस्त झाला की हॉटेल आणि खोल्यांचे भाडे, त्यातून मिळणारे सर्व उत्पन्न मोहिनीच्या हातात येणार होते. त्यातूनच अक्षय आणि मोहिनी या दोघांनी मिळून सतीश वाघ यांची पाच लाख रुपयांत सुपारी देऊन हत्या केली असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.