Swapna Patker On Sanjay Raut:
कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ केला जातोय, असा आरोप पाटकर यांनी केला आहे.
राऊतांवर कायदेशीर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे आणि स्वप्ना पाटकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे. या पत्रकार परिषद आधी स्वप्ना पाटकर यांनी नीलम गोऱ्हे यांना एक निवेदन दिलं. हेच निवेदन गोऱ्हे यांनी यावेळी वाचून दाखवलं.
यात लिहिलं आहे की, ''हजारो पत्रे पोलीस विभागाला आणि मला मदत करू शकणाऱ्या लोकांना मी लिहिली आहेत. पण तरीही मला त्रास होत आहे. आज पुन्हा पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या महिन्याभरापासून माझे लक्षात आले आहे की, मी जिथे जाते तिथे माझा पाठलाग केला जातो. २ मे रोजी दुपारी ४ च्या सुमारास मी एक व्यक्ती बाईकवर पाहिली. बीकेसी वन या बिल्डिंग पासून माझा घरापर्यंत माझ्या मागे फिरताना पाहिली. मी घरी पोहोचेपर्यंत बाईक माझ्या मागे होती. हे माझ्यासोबत पूर्वी घडलेल्या सर्व गोष्टींसारखेच आहे. आता मला कोण आणि कशी मदत करेल हे मला माहीत नाही.''
यामध्ये पुढे लिहिलं आहे की, ''2013 मध्ये मुंबईत एका महिन्याच्या कालावधीत माझ्यावर दिवसा 2 वेळा हल्ला झाला. जिथे सर्वत्र सीसी टीव्ही कॅमेरे आहेत. कोणी सापडले नाही, असे सांगून प्रकरणे बाजूला ठेवण्यात आले. माझ्या कोणत्याही प्रकरणात मुंबई पोलिसांना काहीच सापडले नाही, हे कसे शक्य आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे.''
पाटकर यांनी निवेदनात लिहिलं आहे की, ''संजय राऊत यांनी मला फॉलो करण्यासाठी आणि माझा ठावठिकाणा शोधण्यासाठी स्टार सुरक्षा गुप्तहेर नियुक्त केले होते. मी कुठे आणि कोणासोबत आहे हे सांगणारे राऊतचे ईमेल आणि मेसेज मला यायचे. त्याची तक्रार केली होती. पण त्यावर माझी तक्रार नोंदवली गेली नाही. एक दिवस माझा पाठलाग करणाऱ्या स्टार सिक्युरिटीच्या व्यक्तीला मी हुशारीने वाकोला पोलीस ठाण्यात आणले आणि पोलिसांनी त्याला अटक केली. परंतु पोलिसांनी एफआयआर मध्ये संजय राजाराम राऊतचे नाव लिहिले नाही आणि स्टार सुरक्षेवरही आरोप केला नाही. गुप्तहेर व्यंकटेश उप्पर याला अटक करण्यात आली. त्याला जामीन मिळाला पण तो सध्या फरार आहे.'' दरम्यान, स्वप्ना पाटकर यांनी केलेल्या आरोपांवर संजय राऊत यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.