विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सदाभाऊ खोत यांची पहिली प्रतिक्रिया...

राज्यसभा निवडणूक पार पाडल्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजपने विधानपरिषदेसाठी जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे.
Sadabhau Khot News, Vidhan Parishad News
Sadabhau Khot News, Vidhan Parishad NewsSaam Tv
Published On

मुंबई : राज्यसभा निवडणूक पार पाडल्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजपने विधानपरिषदेसाठी जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. राज्यात विधानपरिषदेसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपने राज्यसभा निवडणुकीमध्ये सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. त्यानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. दरम्यान, विधान परिषदेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज सदाभाऊ खोत यांनी मागे घेतला आहे. (Sadabhau Khot News)

Sadabhau Khot News, Vidhan Parishad News
राज्यसभा निवडणुकीत मते फुटल्यानं शरद पवारांची नाराजी; प्रमुख नेत्यांना म्हणाले...

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून मला निरोप आला. आपण पाच जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सहावी जागा मागे घ्यावी लागणार आहे. त्यानुसार मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

'भाजपने जेवढा सन्मान द्यायचाय तो दिला'

भाजपसोबत (BJP) घटक पक्ष म्हणून आलो. महादेव जानकर, मी किंवा मेटे यांना आमदार केलं. आम्हाला मंत्रिपदंही दिली. रामदास आठवले यांनाही खासदार केलं. त्यांना केंद्रात राज्यमंत्रिपद दिलं. जेवढा सन्मान करायचा तेवढा भाजपनं केला आहे. मी समाधानी आहे, असं सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेची उमेदवारी पुन्हा मिळाल्यानं कार्यकर्ते खूश आहेत, मात्र आता माघार घेतल्याने नाराज आहेत का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता, आम्ही मातीसाठी लढणारे लोक आहोत. आमचा जन्म राजकारणासाठी झाला नाही. फक्त ज्या ठिकाणी धोरणं ठरतात, ठरवली जातात, त्या व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी जो विश्वास दाखवला, तो सार्थ करण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला, असं खोत म्हणाले.

Sadabhau Khot News, Vidhan Parishad News
कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? मग कशासाठी 'हा' आटापिटा : सदाभाऊ खाेत

महाविकास आघाडीवर टीकास्त्र

राज्यातील अनेक प्रश्न महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सोडवले नाहीत. मुख्यमंत्री घरात बसले आणि जनता रस्त्यावर दिसली. त्याची खदखद मतपेटीतून व्यक्त होईल. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही खोत यांनी व्यक्त केला. ही निवडणूक कोण कोणाच्या विरोधात लढतोय, हे महत्वाचं नाही. जनता नाराज आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ही नाराजी दिसेल, असेही ते म्हणाले.

...तोपर्यंत मी लढत राहीन!

राजकारणात येण्यासारखी माझी काही पार्श्वभूमी नाही. मी एका लहानशा गावातून आलो. माझा प्रवास तिथून सुरू झाला. ग्रामीण भागात काम करत असताना कष्टकरी वर्गाला भेडसावणारे प्रश्न, त्यांच्यासाठीचे लढे मी लढलो. मला आतापर्यंत भरपूर काही मिळालं. येथून पुढच्या काळात जो लढा घेऊन निघालोय, तो सुरूच राहील. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा जोपर्यंत लढा आहे, तो मी असेपर्यंत लढतच राहणार आहे, असंही खोत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com