पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घराणेशाहीच्या मुद्द्यावर वारंवार विरोधी पक्षांवर निशाणा साधत आहेत. काल पंतप्रधान मोदी तेलंगणा दौऱ्यावर होते, तेथेही त्यांना याच मुद्द्यावर काँग्रेस आणि बीआरएसवर सडकून टीका केली. याच टीकेला शिवसेनेच्या मुखपत्र 'सामना'तून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
भाजप आज 'पब्लिक कंपनी' म्हणजे लोकांचा सहभाग असलेला पक्ष नाही. भाजप आज भागधारक, भांडवलदार, व्यापारी, गुंतवणूकदार लोकांचा प्रायव्हेट पक्ष बनला आहे. काँग्रेस पक्षाने सार्वजनिक उपक्रमांचा रचलेला पाया श्री. मोदी प्रा. लिमिटेड कंपनीने मोडून विकून खाल्ला, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेने, 'ठाकरे' घराण्याने सामाजिक, राजकीय वारसा निर्माण केला. मोदी-शहा यांना कोणताही वैचारिक, सांस्कृतिक वारसा नाही. ते आले तसे जातील. त्यांचे नामोनिशाणही इतिहासात राहणार नाही. अंध भक्तांच्या कुजबुजीवर वारसा टिकत नाही. त्यासाठी जमिनीत व लोकांच्या मनात रोपटे पेरावे लागते. दुसऱ्यांनी लावलेली रोपटी उपटून स्वतःचा विचार कसा पेरणार? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. (Latest Marathi News)
पंतप्रधान मोदी आणि भाजप ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांवर बोलत आहेत, यातील बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्या भाजपने चालवायला घेतल्या आहेत.ज्याला कुटुंब आहे त्याला भावना आहेत, भावना आहेत म्हणजे परिवार आहे. परिवार नसलेले लोक भावनाशून्य असतात.
परिवारवादावर टीका करणाऱ्या भाजपची विसंगती अशी की, ओडिशात नवीन पटनायक, आंध्रात जगनमोहन रेड्डी यांच्या राजकीय परिवारवादावर बोलत नाहीत. मोदी हे परिवारवादासंदर्भात किती 'ढोंगी' भूमिका घेत आहेत ते स्पष्ट होते, अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात मायावती यांच्या 'प्रायव्हेट कंपनी'शी सूत जुळवण्याचे प्रयत्न भाजप करत आहे. 'इंडिया'ला रोखण्यासाठी 'एमआयएम' या आणखी एका प्रायव्हेट कंपनीशी छुपी हातमिळवणी त्यांनी केलीच आहे. महाराष्ट्रात बारामती परिवारातल्या अजित पवारांना भाजपने मांडीवर घेतले आहे. कर्नाटकातील आणखी एक प्रायव्हेट कंपनी देवेगौडाकृत जनता दल (सेक्युलर) पक्षाशी भाजपने युती जाहीर करून एक प्रकारे परिवारवादाच्या झेंड्याला आपला दांडा दिला आहे, अशी उदाहरणं देत टीका सामनातून करण्यात आली आहे.
देशातील सर्वाधिक राजकीय घराणी आज भाजपमध्ये आहेत. ती काही भाजपचा विचार पटतोय म्हणून नाही. ईडी, सीबीरआयचा धाक दाखवून ही घराणी भाजपने आपल्या तंबूत घेतली आहेत. भाजपचे दात परिवारवादाबाबत जेथच्या तेथे घशात घालता येतील अशी अनेक उदाहरणे देता येतील. अमित शहांचा परिवारवाद भारतीय क्रिकेटमध्ये कोणत्या निकषावर 'विटीदांडू' खेळत आहे? हा एखाद्याचा संशोधनाचा विषय आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.