पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांच्या दिल्लीतील घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं आणि आरती केली. पीएम मोदींच्या सरन्यायाधीशांच्या घरी जाणं आणि एका खासगी कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे आता राजकारण तापले आहे. सर्वच स्तरावरून या घटनेवर प्रतिक्रिया येत असून पीएम मोदींवर टीका केली जात आहे.
या घटनेमुळे राजकारण देखील चांगलेच तापले आहे. विरोधीपक्षांनी पीएम मोदींना या मुद्द्यावरून धारेवर धरले आहे. सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. 'भारतीय राज्यव्यवस्थेचा शेवटचा खांबदेखील मोदींनी पाडला आहे. अनेक वादळांमध्ये देशाचे चारही खांब टिकून राहिले पण गेल्या १० वर्षांत ते पाडण्यात आले. देशाच्या प्रतिष्ठेची ही घसरण आहे.', अशी शब्दात सामनातून मोदींवर टीका करण्यात आली आहे.
सामनामध्ये असे लिहिण्यात आले आहे की, 'पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीची आरती केली. याबाबत देशातील स्वतंत्र विचारांच्या नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. संविधान आणि न्यायव्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा आहे. सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांची ही खासगी कौटुंबिक भेट टाळायलाच हवी होती, असे अनेक घटनातज्ञांचे मत आहे. आता लोकांना आपल्या संविधानाबाबत खरोखरच चिंता वाटू लागली आहे. पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी आरती केली. दिवे पेटवले. लोकशाहीत शेवटचा आशेचा किरण न्यायाच्या दिव्याकडून असतो. हे लोकशाहीचे दिवे विझत आहेत आणि न्यायालयाकडून आशा राहिलेली नाही. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनाही हे समजले असेल.'
आमदार फुटीवरून देखील सामनातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. 'सध्या संपूर्ण देशात मोदी-चंद्रचूड भेटीचा 'बॅड सिग्नल' म्हणजे चुकीचा संदेश गेल्याचे मत प्रशांत भूषण यांनी व्यक्त केले. इतर कायदेपंडितांच्या मनात याच भावना असतील, पण त्यांना व्यक्त होण्याची भीती वाटते. देशात गेल्या दहा वर्षांत संविधान आणि लोकशाहीचे पतन झाले आहे. निवडणूक आयोग, न्यायालयासारख्या संस्था मोदींनी आपल्या टाचेखाली घेतल्या. त्यामुळे भ्रष्टाचार, उद्योगपतींची लुटमार, बेकायदेशीर पक्षफोडी, आमदार-खासदारांच्या खरेदी-विक्रीला प्रतिष्ठा मिळाली. महाराष्ट्रासारख्या राज्यात लोकशाही नष्ट केली व आमदार-खासदारांचा सौदा करून सरकार पाडले.', असे मत सामनातून व्यक्त करण्यात आले.
यावेळी सामनातून सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर देखील टीका करण्यात आली आहे. लोकशाही व संविधानाच्या मोडतोडीत ज्यांनी मोदी-शहांना मदत केली अशा सगळ्याच न्यायमूर्तींची सोय सरकारने केली आहे. निवृत्तीनंतरची ‘सोय’ हीच न्यायव्यवस्थेतील सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याबाबत लोकांचे मत वेगळे होते आणि आहे. एक तर चंद्रचूड यांच्या घराण्याची न्यायदानाची परंपरा महान आहे. यशवंत विष्णू चंद्रचूड हे इंदिराजींच्या काळात देशाचे सरन्यायाधीश होते आणि ते विद्यमान सरन्यायाधीशांचे पिताश्री आहेत. दुसरे म्हणजे चंद्रचूड हे महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने ते कोणत्याही दबावाला आणि राजकीय अमिषाला बळी पडणार नाहीत अशी एक खात्री होती. महाराष्ट्राच्या मातीतून न्याय आणि संविधान रक्षणाची बिजे रोवली गेली आहेत. या परंपरांचे पालन सरन्यायाधीश करतील आणि आपल्या कृतीतून सिद्ध करतील.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.