पुणे अपघात प्रकरणातील (Pune Porsche Car Accident) आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी अटक केलेल्या ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि डॉ. श्रीहरी हाळनोर (Dr Shrihari Halnor) यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दोन्ही डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांचे निलंबन करण्यासाठीचा अहवाल पुणे पोलिसांमार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविण्यात येणार आहे. निलंबन होण्यासाठी आवश्यक असलेली पोलिस कारवाई त्यांच्यावर झालेली आहे. त्यामुळे पोलिसांकडून संबंधित विभागाला याबाबत बुधवारी अहवाल पाठवला जाणार आहे. या अहवालावर संबंधित विभागाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे.
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप करत पुणे पोलिसांनी सोमवारी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, श्रीहरी हाळनोर आणि शिपायी अतुल घटकांबळे यांना अटक केली होती. आरोपी मुलगा हा मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत होता. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन त्याचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले होते. पण याच ब्लड सॅम्पलमध्ये या तिघांनी फेरफार झाल्याचा आरोप आहे. यासाठी पैशाची देवाण-घेवाण देखील झाली असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पुणे पोलिसांचे पथक डॉ. अजय तावरेच्या घरी गेले होते. पुणे पोलिसांकडून अजय तावरेच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. अजय तावरेच्या अटकेनंतर पुणे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली होती. अशामध्ये आता पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाचा शिपायी अतुल घटकांबळेच्या मोबाईलची पोलिसांनी सखोल तपासणी केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून घटकांबळेचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याच्या मोबाईलमधून अनेक वेळा डॉ. तावरे यांच्याशी संपर्क केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पुणे पोलिसांकडून अतुल घटकांबळेच्या मोबाईलमधील कॉल, फोटो आणि इतर ॲप्स तपासले जाणार आहे. ३ लाख रुपये रक्कम स्वीकारणारा अतुल घटकांबळे हा ससून रुग्णालयातील शवागृहाचा शिपाई आहे. डॉ.अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांचा मोबाईल ॲप्सवरून एकमेकांशी संपर्क व्हायचा. संशय येऊ नये म्हणून नॉर्मल कॉल न करता ते ॲप्सचा वापर करत असल्याचे देखील तपासातून समोर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.