पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या कार आणि दुचाकीच्या अपघातामध्ये (Pune Kalyaninagar Car Accident) मृत्यू झालेल्या अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अश्विनीच्या मृत्यूमुळे कोष्टा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी अश्विनीच्या वडिलांनी केली आहे. त्याचसोबत, आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जावी असे देखील त्यांनी सांगितले. अश्विनी कोष्टाचा (Ashwini Koshta) मृतदेह मध्य प्रदेशमधील घरी पोहचताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
अश्विनीचे वडील सुरेश कोष्टा यांनी सांगितले की, 'भारतीय संविधानामध्ये कायदा आधीपासूनच बनवला आहे. आरोपीवर संविधानातील कायद्यांप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. यामुळे इतर लोकांना धडा मिळेल. आमची मुलं मोठी होईपर्यंत आम्ही त्यांना गाडी नाही दिली. आम्हीसुद्धा त्यांना गाडी देऊ शकलो असतो पण त्यांना ती चालवता यायला पाहिजे.'
पुण्यातील अपघातामध्ये मृत्यू झालेली अश्विनी कोष्टा ही मध्य प्रदेशची होती. जबलपूरमध्ये हिल्स शक्तीनगरमध्ये ती कुटुंबीयांसोबत राहत होती. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली अश्विनी गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये नोकरी करत होती. अश्विनी भावंडांमध्ये सर्वात लहान होती. तिचे वडील मध्य प्रदेश पूर्व क्षेत्र विद्युत वितरण कंपनीच्या एमडी कार्यालयात कार्यरत आहेत. अश्विनीचा भाऊ सम्प्रित बंगळुरू येथे सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी करतो. अश्विनी गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी करत होती.
अश्विनी कोष्टाचे काका अयोध्या प्रसाद कोष्टा यांनी सांगितले की, अश्विनी यापूर्वी ॲमेझॉन कंपनीत काम करत होती. वर्षभरापूर्वी तिने जॉब स्विच केला. ती पुण्यातील जॉन्सन कंट्रोल्स कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. अश्विनी गेल्या सहा वर्षांपासून पुण्यात राहत होती. तिने पुण्यातच शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होती. कुटुंबामध्ये ती वडिलांची खूप लाडकी होती. ती दररोज वडिलांशी फोनवर बोलायची.
दरम्यान, १९ मे रोजी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगरमध्ये भरधाव कारने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातामध्ये अश्विनी कोष्टा आणि तिच्या मित्राचा मृत्यू झाला होता. अश्विनी तिच्या मित्रांसोबत पार्टी करून दुचाकीवरून घराच्या दिशेने जात होती. तेवढ्यात भरधाव पोर्शे कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातमध्ये अश्विनी आणि तिच्या मित्राचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी कारचालकाला अटक केली पण अल्पवयीन असल्यामुळे त्याला जामीन मिळाला . आता याप्रकरणात पोलिसांनी कारचालक मुलाचे वडील आणि दोब पब चालकांना अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.