
पुण्यातल्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला पुण्यात मोठं खिंडार पडलं आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी पक्षाला सोडचिट्टी देत असल्याचं जाहीर केले. सोशल मीडियावर पोस्ट करत विशाल धनवडे यांनी गंभीर आरोप करत पक्षाला रामराम ठोकला. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले आहे. सोबतच बाळा ओसवाल यांनी देखील याबाबतची पोस्ट केली आहे. त्यांच्यासोबत इतर ५ माजी नगरसेवक देखील लवकरच भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.
काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुण्यातील आणि पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. मात्र या बैठकीला एकही माजी नगरसेवक उपस्थित राहिला नव्हता. त्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी समोर आली होती. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भेट घेतली होती त्यानंतर हे माजी नगरसेवक भाजपमध्ये लवकरच प्रवेश करतील असं सांगण्यात येत होतं. मात्र प्रवेशाची तारीख निश्चित ठरली नव्हती.
पण आता विशाल धनवडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. विशाल धनवडे यांच्यासोबत माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांनी देखील पक्ष सोडला असल्याचे जाहीर केले आहे. विशाल धनवडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टसोबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
विशाल धनवडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, 'सप्रेम जय महाराष्ट्र, आजच्या या पत्रास कारण की या नवीन वर्षात मी एक निर्णय घेतला आहे आणि या निर्णयात आपली भूमिका महत्वाची आहे. काही निर्णय घेताना त्रास होतो तसा मला ही झाला आहे मागील एक महिन्यापासून झोप नाही, प्रेशर मुळे BP ची गोळी चालू झाली. परंतु आता निर्णय झाला आहे त्यामुळे बाळासाहेब ठाकरे म्हणतात तसे एकदा निर्णय घेतला की, घेतला परत मागे नाही फिरायचे तसे झाले आहे. मी कधी माझ्या स्वप्नात ही विचार केला नाही की माझी शिवसेना मला सोडावी लागेल, ज्या शिवसेनेवर मी एवढं प्रेम केले, ती वाढवण्यासाठी एवढे कष्ट घेतले.'
पुण्यातील शिवसेनेला कोणीही वाली नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी पुढे लिहिले की, 'ज्या शिवसेनेने मला एवढे प्रेम दिले, नाव दिले, मोठे केले ती शिवसेना सोडताना खूप त्रास होतो आहे परंतु शिवसेना का सोडतोय? याला खूप कारणे आहेत परंतु जाताना कोणाला ही नाव ठेवून जायचे नाही यामध्ये माझी शिवसेना, माझे उद्धव साहेब, आदित्य साहेब यांच्या बद्दल मला खूप आदर आणि प्रेम आहे त्यांच्या बद्दल कोणतीही तक्रार नाही. परंतु पुण्यातील शिवसेनेला कोणीही वाली नाही इथे जिल्ह्यात पक्षालाच शिवसेना नकोय असे वाटायला लागले आणि यातूनच घुसमट चालू झाली. ना पुण्यात लोकसभेला जागा, ना ही विधानसभेला. आणि जागा मिळाली तरीही त्या उमेदवाराच्या मागे कोणतीही ताकत द्यायची नाही कोणतीही रसद पुरवायची नाही. ना कोणत्या शिवसैनिकाला कसलीही मदत करायची नाही ना कोणत्या शिवसैनिकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचे नाही.'
विशाल धनवडे यांनी पुढे लिहिले की, 'पुण्यात शिवसेनेला कोणीही वाली नाही. ज्यांच्यात शिवसेना वाढवण्यासाठी काम करण्याची भूक आहे त्याला काम करू न देणे हे मागील 5 वर्षे झाले चालू आहे, पक्षातील जे नगरसेवक आहे ते वाढवायचे सोडून जे आहेत त्यांच्याच पायात पाय घालण्याचे काम चालू आहे. संपर्क प्रमुखांच्या कानावर यासर्व गोष्टी असून सुद्धा ते काहीही करू शकले नाहीत असे म्हण्यापेक्षा त्यांच्या हातात काहीही न्हवते असे आहे. जे काहीही करू शकत नाही असे लोक संघटना चालवतं आहेत, ज्यांचे खरे काम बॅक ऑफिस सांभाळणे आहे त्यांना पक्ष सांभाळायला दिला आहे.'
तसंच, 'पक्षात मागील 5 वर्षात पक्ष वाढवण्यासाठी एकही बैठक झाली नाही की त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. असो अशी बरीच कारणे आहे परंतु आता कोणतीही कारणे न देता मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो आहे पुढील काळात प्रभागासाठी आणि शहरासाठी खूप काही करायचे आहे नक्कीच जे करू ते चांगले करू असा विश्वास आहे यामध्ये तुमची साथ मोलाची आणि महत्वाची आहे.आपणास नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. आपला नम्र : विशाल धनवडे' त्यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे तर बाळा ओसवाल यांनीही फेसबुकवर पोस्ट टाकत आपण शिवसेना सोडत असल्याचे जाहीर केले. बाळा उस्वाल हे शिवसेनेचे कट्टर नगरसेवक म्हणून ओळखले जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.