

जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच अजित पवार गटाला मोठा धक्का
राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर भाजपमध्ये प्रवेश करणार
इंदापूर नगर परिषद निवडणुकीतून पक्षांतर्गत वाद उफाळला
ऑपरेशन लोटसअंतर्गत भाजपची पुणे जिल्ह्यात जोरदार तयारी
जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होताच पुण्यात भाजपच्या ऑपरेशन लोटस २.० ला यश आले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नगर परिषद निवडणुकीपूर्वी गारटकर यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. पुढील काही दिवसांत प्रदीप गारटकर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदीप गारटकर यांचा प्रवेश आता निश्चित झाला असून पुढील काही दिवसांतच अधिकृत प्रवेशाची तारीख जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर प्रदीप गारटकर भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात फिरत असताना आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ऑपरेशन लोटस राबवत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनामधील अनेकांना त्यांच्या पक्षात ओढले. मुंबईत झालेल्या मेगा प्रवेश कार्यक्रमात विविध राजकीय पक्षाच्या अनेक आजी- माजी पदाधिकारी, नगरसेवकांनी हाती कमळ घेतले आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट सुद्धा मिळवले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील एकमेव आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे, दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे, सुप्रिया सुळे यांचे विश्वासू सचिन दोडके अशा बड्या नावांनी पक्ष प्रवेश केला.
मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होऊन ७ फेब्रुवारी रोजी त्याचा निकाल लागणार आहे. महापालिका निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच आता सगळे राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, प्रदीप गारटकर हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. मात्र इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी देण्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर समर्थकांनी प्रचंड विरोध दर्शवला होता. यामुळे अजित पवार गटात पक्षांतर्गत दुफळी माजली होती.
'पक्षाने आम्हाला कोललं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही.', असा इशारा गारटकरांनी दिला होता. मात्र तरी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादी ने गारटकर यांना तिकीट नाकारले. अखेर तीव्र नाराजी व्यक्त करत गारटकर यांनी पक्षाचा राजीनामा देत बंडखोरी करत नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला. सगळे विरोधक एकत्र येऊन सुद्धा गारटकर यांना पराभव स्वीकारावा लागला. असं असताना आता भाजप ने त्यांना पक्षात घ्यायचं ठरवलं आहे. अनुभवी राजकारणी आणि इंदापूर मध्ये असलेलं त्यांचं वलय त्यासोबतच त्यांचा जनसंपर्क याचा पक्षाला नक्की फायदा होईल याबाबतची चाचपणी केल्यानंतर भाजप त्यांना एन्ट्री देण्याच्या तयारीत आहे.
७ डिसेंबर रोजी भाजपची पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक बैठक पार पडली होती. या बैठकीला केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप चे महामंत्री राजेश पांडे उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आणि त्यानंतर प्रदीप गारटकर यांनी याठिकाणी येत मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली होती. गारटकर यांच्या उपस्थितीमुळे त्यादिवशी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.