अक्षय बडवे
पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाविद्यालयातील १९ वर्षीय विद्यार्थिनी तब्बल १४ तास लिफ्टमध्ये अडकून पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, रात्रभर तिचा शोध सुरू असतानाही ती महाविद्यालयाच्या इमारतीतील लिफ्टमध्ये असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. अखेर गुरुवारी सकाळी लिफ्ट सुरू झाल्यानंतर तिची सुटका झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लेक्चर संपल्यानंतर विद्यार्थिनी लिफ्टने जात होती. त्यावेळी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या दरम्यान लिफ्ट बंद पडली. त्यामुळे ती आतच अडकली. बाहेर पडण्यासाठी तिने दरवाजा ठोठावला आणि आरडाओरड करून मदत मागितली. मात्र, तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचला नाही. मोबाईलला नेटवर्क नसल्याने तिला कोणाशीही संपर्क साधता आला नाही.
मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यांनी लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधून तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. नातेवाईकांकडे चौकशी आणि परिसरात शोध घेऊनही तिचा पत्ता लागला नाही. अखेर मध्यरात्री पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलीस, महाविद्यालयीन कर्मचारी आणि कुटुंबीयांनी रात्रभर शोधमोहीम राबवली.
मात्र, ज्या परिसरात शोध सुरू होता, त्याच इमारतीतील लिफ्टमध्ये विद्यार्थिनी अडकली होती. गुरुवारी सकाळी लिफ्ट नेहमीप्रमाणे सुरू झाल्यानंतर तब्बल १४ तासांनी तिची सुटका झाली.
या घटनेनंतर महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्था, लिफ्टची देखभाल आणि आपत्कालीन मदत यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. महाविद्यालय प्रशासनाने घटनेची दखल घेत चौकशी समिती स्थापन केली आहे. संबंधित परिसरात वीजपुरवठा पाच ते सहा वेळा खंडित झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तांत्रिक कारणांसह सर्व बाबींची चौकशी केली जाणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.