पुण्यामध्ये गणेशोत्सवात (Pune Ganeshostav 2024) लेझर बीम लाइटच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मात्र दहीहंडीपासूनच होणार आहे. पुणे पोलिसांनी लागू केलेल्या या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. लेझर बीम लाइटमुळे नागिराकांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे. गेल्यावर्षी लेझर बीम लाइटमुळे अनेकांच्या दृष्टीवर परिणाम झाला त्यामुळे यावर्षी पुणे पोलिसांनी लेझर बीम लाइटवर बंदी घातली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये गणेशोत्सवात लेझर बीम लाइटच्या वापरास बंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी दहीहंडीपासूनच होणार आहे. पुण्यात लेझर बीममुळे नेत्रपटलाला इजा झाल्याची १५ प्रकरणं गेल्या वर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर समोर आली होती. या लेझर बीम लाइटमुळे डोळ्यांना गंभीर त्रास झाल्याची प्रकरणं वाढत गेली होती. त्यामुळे लेझर बीम लाइटवर बंदीची मागणी केली जात होती. यंदाच्या दहीहंडी आणि गणेशोत्सवामध्ये कोणी लेझर बीम लाइट लावल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे स्पीकरवर लावण्यात येणाऱ्या लेझर बीम लाइटवर बंदी घालण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला होता. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कोणी लेझर बीम लाइटचा वापर केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. यंदा २७ ऑगस्ट रोजी दहीहंडी आणि ९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. या दोन्ही सणांदरम्यान पुण्यामध्ये लेझर बीम लाइट वापरावर बंदी असणार आहे.
दरम्यान, पुण्यामध्ये गेल्यावर्षी गणेशोत्सवात लेझर बीम लाइटचा मोठ्याप्रमाणात वापर करण्यात आला होता. या लेझर बीम लाइटमुळे पुणेकरांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम झाले होते. काही तरुणांच्या दृष्टीवर परिणाम झाला. त्यांना दिसणे कमी झाले. पुण्यामध्ये गणेशोत्सवामध्ये मोठ्याप्रमाणात डीजेचा वापर केला जातो. या डीजेच्या आवाजाने लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच त्रास होतो. त्यामुळे विविध आजार उद्भवतात. अशामध्ये पुणेकरांनी डीजेपेक्षा ढोल, ताशा आणि इतर वाद्यांच्या आवाजामध्ये गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.