
अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी
Pune Traffic Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे कारण पुणे शहरातील वाहतूक कोंडी तब्बल ५३ टक्क्यांनी कमी झाली आहे तर वाहतुकीचा वेग १०.४४ टक्क्यांनी वाढली आहे. या विषयी आज पुणे पोलिसांनी महत्वाची पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पुणे शहरात सर्वात पहिल्यांदा ए टी एम एस (अडपटीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम), गुगल मॅप्स, नागरिकांच्या तक्रारी व सोशल मिडिया यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडीचा विश्लेषणात्मक अभ्यास करून वाहतुकीत सुधारणा करण्यात आली आहे. वाहतूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण, सिग्नल यंत्रणेमध्ये केलेले बदल, ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्था याची अंमलबजावणी यामुळे पुणेकरांचा वाहतूक कोंडीचा मनस्ताप कमी होणार आहे. याशिवाय नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहिमेअंतर्गत मागील वर्षीच्या ३ महिन्याच्या तुलनेत पाच पट वाढ झाली असून कारवाईत सुद्धा दुप्पट वाढ झाली आहे."
टॉम-टॉम या डच संस्थेने वाहतूक कोंडीत पुणे शहर चौथा क्रमांकावर असल्याचे जाहिर केल्यानंतर अनेकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने विविध कोंडीची कारणे आणि त्यावर उपाययोजना कशा राबवल्या जाऊ शकतात याचा तांत्रिक अभ्यास केला.
या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांच्या अभ्यासातून वेगवेगळ्या कारणास्तव सव्वा चारशेवेळा वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी यातूनही स्पष्टता आणत कोंडी टाळता येणारी कारणे व टाळता न येणारी कारणेही, शोधली आहेत. यानूसार आता कोंडी न होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, त्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.
काही झाली वाहतूक कोंडी कमी
पुण्यातील वाहतूक कोंडी ५३ टक्क्याने कमी करण्यासाठी तसेच वेग वाढवण्यासाठी पोलिसांनी अनेक उपाययोजना राबवल्या. यामध्ये वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाथुक नियमन, वाहतुकीचे कायदे व नियम, सॉफ्ट स्किल यासह इतर अभ्यासक्रम असणारे प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले. यासोबतच सिग्नल यंत्रणेमध्ये बदल केल्याने वाहतूक गतिमान होण्यास मदत झाली. पुणे शहरातील एकूण ३०२ सिग्नल पैकी १२४ सिग्नल हे ए टी एम एस (अडपटीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणालीवर कार्यरत आहेत.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ५९ ठिकाणी केलेल्या बदलामुळे वाहतुकीच्या वेग वाढण्यास सुद्धा मदत झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसचं लक्झरी बसेस करिता पोलिसांनी ऑफ स्ट्रीट पार्किंगची व्यवस्था करून दिल्याने सुद्धा वाहतुकीचा वेग वाढला असल्याचे सांगितले गेले आहे.
नियमाचे पालन न करणाऱ्या पुणेकरांनो लक्ष द्या
नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहिमेअंतर्गत मागील वर्षीच्या ३ महिन्याच्या तुलनेत पाच पट तर एकूण कारवाईत दुप्पट वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये २ लाख ३५ हजार इतकी कारवाई करण्यात आली तर हाच आकडा यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यात ४ लाख ४५ हजारांवर गेला आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, धोकादायक वाहन चालवणे आणि जड वाहतूक या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
१० किलोमिटर प्रवासाठी आता ३३ मिन २२ सेकंड
पुणेकरांना १० किलोमीटरचा टप्पा गाठण्यासाठी ३३ मिन २२ सेकंड इतका कालावधी लागतोय तर २०२३ मध्ये हेच अंतर गाठण्यासाठी ३४ मिन २० सेकंड लागत होता. म्हणजेच २०२३ पेक्षा २०२४ मध्ये १ मिन ने वेळ कमी झाली असा अहवाल टॉम टॉम ने दिला आहे.
पुणे शहरातील वाहतूक कोंडी होणारे टॉप १० ठिकाणं
नॉर्थ मेन रोड, वेस्टिन हॉटेल (मुंढवा वाहतूक विभाग)
हडपसर भाजी मंडई (हडपसर वाहतूक विभाग)
धायरी फाटा, वडगाव पूल (सिंहगड रोड वाहतूक विभाग)
मालधक्का चौक (बंडगार्डन वाहतूक विभाग)
संचेती हॉस्पिटल चौक (शिवाजीनगर वाहतूक विभाग)
नवले पूल (सिंहगड रोड वाहतूक विभाग)
केसनंद फाटा (वाघोली वाहतूक विभाग)
विद्यापीठ चौक, सेनापती बापट रोड (चतुशृंगी वाहतूक विभाग)
खडी मशीन चौक (कोंढवा वाहतूक विभाग)
गोळीबार मैदान चौक (वानवडी वाहतूक विभाग)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.