Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. विवाहित महिलांवरील सातत्याने अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहे. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यात एका नराधम पतीने ५ मित्रांसह आपल्याच पत्नीवर सामूहिक बलात्कार केला आहे.
पुण्यातील मार्केट यार्डजवळील परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या ५ मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह २०१६ मध्ये संभाजीनगर येथील एका तरुणासोबत झाला होता. लग्नानंतर पतीने तिचा छळ सुरू केला. दररोजच्या भांडणाला कंटाळून पीडित महिला आपल्या माहेरी पुणे येथे आली. दरम्यान, २० फेब्रुवारी २०२० रोजी पीडित महिला तिच्या वडिलांच्या घरी असताना पतीने तिला फोन करून घराबाहेर येण्यास सांगितले.
पीडिता घराबाहेर येताच आरोपी पतीने तिला घराजवळील झुडपामध्ये खेचत नेलं. त्याठिकाणी आरोपीचे ५ मित्र उपस्थित होते. यावेळी पतीसह ५ नराधमांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी अत्याचाराचे मोबाईलवर चित्रिकरण सुद्धा केले.
याबाबत कुणाला सांगितल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. दरम्यान, या घटनेनंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नाही. आरोपींनी याच गोष्टीचा फायदा घेत २०२० व २०२१ मध्ये वारंवार बोलावून तिच्यावर गाडीमध्ये सामूहिक बलात्कार केला.
दरम्यान, वेदना असह्य झाल्याने पीडितेने या संपूर्ण प्रकाराची माहिती आपल्या वडिलांना दिली. मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं कळताच वडिलांनी पीडितेला घेऊन तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.