सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
CCTV footage of Gangadham Chowk Pune accident : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधाम चौकात आज सकाळी ११:१५ वाजता झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक पुरुष जखमी झाला. ट्रक (क्रमांक MH 14 AS 8852) ने स्कूटरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मृत महिला दिपाली युवराज सोनी (वय २९) आणि जखमी जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) अशी अपघातग्रस्तांची नावे आहेत. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघातानंतर चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिग्नल सुटल्यानंतर स्कूटर पुढे जात असताना ट्रक चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत स्कूटरला धडक दिली. यात दिपाली सोनी यांचा जागीच मृत्यू झाला, तर जगदीश सोनी यांना स्पायरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ट्रक चालक शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय ५१, रा. भवानी पेठ) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.
गंगाधाम चौकात अपघात झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी BNSS कलम १०५ (आयपीसी ३०४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. रस्ता वाहतुकीसाठी खुला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका संयुक्तपणे कारवाई करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.