
कल्याण -शीळ या महत्त्वाच्या मार्गावर पलावा जंक्शन येथे होणाऱ्या कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे. या मार्गावरील बहुप्रतिक्षित पलावा उड्डाण पुलाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण होताच या मार्गिकेचे आज आमदार राजेश मोरे यांनी कोणताही गाजावाजा न करता लोकार्पण केले. त्यामुळे नवी मुंबईकडून येणाऱ्या वाहन चालकांची पलावा जंक्शन येथील वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे. अनेक दिवसांपासून या पुलाच्या लोकार्पणाची प्रतिक्षा अखेर संपली आहे .
शिळफाटा ते रांजनोली दरम्यान होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ५६२ कोटीच्या निधीतून रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरनाचे काम २०१८ साली सुरू करण्यात आले. तर या मार्गावरील पलावा जंक्शन येथील कोंडी फोडण्यासाठी पलावा जंक्शन येथे उड्डाणपूल प्रस्तावित करत २०२१ साली या पुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र मागील ५ वर्षांपासून या पुलाची प्रतिक्षा कायम होती. रस्ते विकास महामंडळाकडून या पुलासाठी अनेकदा डेडलाईन देण्यात आली होती मात्र पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने या चौकातील कोंडीत वाहनचालकांची घुसमट होत होती.
ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी होत होती. आमदार राजेश मोरे यांनी या पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करत नागरिकांसाठी खुला करण्याच्या सूचना देत पुलाची वारंवार पाहणी केली होती. अखेर पुलाचे काम पूर्ण झाल्याची माहिती मिळताच आमदार मोरे यांनी तात्काळ शुक्रवारी दुपारी या पुलाचे लोकार्पण करत पूल वाहतूकसाठी खुला केला. या पुलामुळे कल्याण -शीळ मार्गावरील पलावा जंक्शनवरील कोंडीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे.
२०२१ साली सुरू करण्यात आलेल्या या पुलाची लांबी ९९३ मीटर असून हा पूल १२ मीटर रुंदीचा आहे. या पुलाची कल्याण दिशेने येणारी मार्गिका सुरू करण्यात आली असून शीळ दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित पुलाच्या कामात अतिक्रमण असून हे अतिक्रमण हटविल्यानंतर हे काम पूर्ण करता येईल असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान उद्घाटनानंतर बोलताना आमदार मोरे यांनी 'आम्ही ट्विटरवर, इन्स्टाग्रामवर टीका करत नाही. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करतो.' - असे म्हणत मनसे आमदार राजू पाटील आणि उबाठा जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांना टोला लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.