

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत काही आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मोठा धक्का बसला.
अजित पवार यांनी रविवारी निर्णय घेण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयानंतर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'दादाच्या निर्णयाबद्दल आणि त्याच्या मनात नेमकं काय चाललं होतं याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं.', अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळे यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, दादाच्या निर्णयाबद्दल मला अजिबात माहिती नव्हते. रविवारी मी दादाच्या देवगिरी या निवासस्थानी बराच वेळ होते. आमच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. पण दादाच्या मनामध्ये काय चाललं होतं याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं.
'मी दादाच्या निवासस्थानी असताना काही वेळानंतर एक-एक आमदार दादाच्या देवगिरी बंगल्यावर येऊ लागले. तेव्हा मला वाटलं होतं की हे सर्वजण प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आले आहेत. दादाने काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती. मी दादाच्या निवासस्थानावरुन निघाले त्यानंतर दादा त्याच्या सर्व समर्थकांना घेऊन राजभवनावर गेला.'
सुप्रिया सुळे यांनी पुढे सांगितले की, 'दादाच्या या निर्णयामुळे मी खूपच निराश झाली आहे. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला पण त्यांनी शरद पवारांना कधीच अंधारात ठेवले नव्हते. शरद पवारांची भेट घेऊन संघटना सोडण्याचे त्यांनी कारण देखील सांगितले होते. साहेबांनी त्यांना रोखले नाही. दादाच्या या निर्णयाचे मला आश्चर्य वाटत नाही. पण मला धक्का बसला आहे.'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयामागे शरद पवारच होते अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पण या सर्व चर्चांचे सुप्रिया सुळे यांनी खंडन केले. त्यांनी सांगितले की, 'दादाच्या या निर्णयाची शरद पवारांनाही काहीच कल्पना नव्हती. पवारसाहेबांना जर याची पुसटशीही कल्पना असती तर त्यांनी पक्षपुनर्बांधणीची मोहिम सुरू केली नसती. बंड केलेल्या नेत्यांविरोधात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंविरोधात कारवाई सुरू केली नसती.'
दरम्यान, अजित पवारांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्व आमदार माझ्यासोबत असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी ९ आमदार सोडले तर इतर सर्व आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.