मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर राज्यातील परिस्थितीवरून जोरदार निशाणा साधला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाच्या निर्णयावरून अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य करताना 'ज्या पक्षाचे एक आणि दोन आमदार आहेत, त्यांचं काय? मनसेचा एक आमदार आहे, त्यांनी म्हणावं का? पक्ष आमचा इंजिन देखील माझंच आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी टीका केली आहे. (Latest Marathi News)
राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी बैठक आयोजित केली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील विविध प्रश्नांवर शिंदे सरकारवर निशाणा साधला.
अजित पवार प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, 'उद्यापासून अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आज आम्ही प्रमुखांची बैठक बोलवली होती. रायपूरला काँग्रेसचे नेते गेले असल्याने बाळासाहेब थोरात यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला त्यांच मत ऐकलं. त्यांनी चर्चा करून झालेल्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे'.
'सरकारने जाहीर केलेली मदत अजून सर्वदूर पोहचलेली नाही. आम्हाला एका शेतकऱ्याने संपर्क साधला. सोलापूर येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी आम्हाला संपर्क केला. त्यांना केवळ 2 रुपयांचा चेक सरकारने दिला आहे. त्यांचा कांदा गेला, तेव्हा त्यांना जे पैसे मिळाले, त्याचे पैसे वजा करून 2 रुपये मिळाले. राजेंद्र चव्हाण हे शेतकरी आम्हाला म्हटले आम्ही जगायचे कसे? असे अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले.
'कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही अवस्था आहे. राज्यकर्ते कोणीही असो पण अशी परिस्थिती शेतकऱ्यावर येता कामा नये. कांद्याची डिमांड सप्लायचा मेळ बसत नाही. कांदा खाणाऱ्या ग्राहकाला कळलं पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.
'कायदा सुव्यवस्था प्रश्न देखील गंभीर आहे. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला, जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना धमकी, आदित्य ठाकरे यांच्या रॅलीवर हल्ला हे गंभीर आहे. कसबा निवडणूक आहे. तिथे तीन-चार दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस ठाण मांडून बसत आहेत, असे अजित पवार म्हणाले.
'निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. निवडणूक आयोगाने निकाल देताना आमदार आणि खासदार जास्त संख्या म्हणून त्यांना नाव आणि चिन्ह दिलं. तर मला म्हणायचं आहे की, काही पक्षाचे एक आणि दोन आमदार आहेत त्यांचं काय? मनसेचा एक आमदार आहे त्याने म्हणावं का? पक्ष आमचा इंजिन देखील माझंच, अशी मिश्किल टिप्पणी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अजित पवार यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.