गुरूसंकल्प सोसायटीत ६ वर्षीय चिमुरडीचा गुदमरून मृत्यू
आईनेच केली पोटच्या मुलीची हत्या
शवविच्छेदनातून गुदमरून खून स्पष्ट
३० वर्षीय आईला अटक
विकास मिरगणे, नवी मुंबई
कळंबोली उपनगरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या आईनेच सहा वर्षांच्या चिमुरडीचा गुदमरून खून केल्याचा प्रकार कळंबोलीतील सेक्टर १ मधील गुरूसंकल्प हाऊसिंग सोसायटीत समोर आला आहे. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी संबंधित ३० वर्षीय महिलेला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूसंकल्प सोसायटीत आयटी अभियंता पती आणि बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेली पत्नी वास्तव्यास होते. २०१७ मध्ये विवाह झाल्यानंतर २०१९ साली त्यांना कन्यारत्न झाले. मात्र, सहा वर्षांच्या या मुलीला लहानपणापासून बोलण्यात अडथळा येत होता. ती मराठीऐवजी हिंदी भाषेत अधिक बोलत असल्याने आई सतत नाराज होती. “मुलगी नको, ती व्यवस्थित बोलत नाही,” असे ती अनेकदा पतीकडे सांगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पतीने तिला समज देण्याचा प्रयत्न केला होता.
अखेर २३ डिसेंबरच्या रात्री या निष्ठुर आईने मुलगी संपविण्याचा निश्चय केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. त्या दिवशी आजी नातीला भेटण्यासाठी भेटवस्तू घेऊन घरी आली होती; मात्र तिची आणि मुलीची भेट होऊ शकली नाही. काही वेळाने पती घरी परतल्यानंतर मुलगी झोपेतून उठत नसल्याचे लक्षात येताच सर्वांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. तेथे सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला.
मात्र कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना मृत्यू संशयास्पद वाटल्याने त्यांनी शवविच्छेदनाची विशेष विनंती केली. प्राथमिक अहवालात श्वसनमार्ग अडथळ्याचे संकेत मिळताच आई-वडिलांची कसून चौकशी करण्यात आली. सुमारे सहा तासांच्या चौकशीनंतर अखेर आईनेच मुलीचा गुदमरून खून केल्याची कबुली दिली. या निर्दयी कृत्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, या महिलेवर मनोविकार तज्ज्ञांकडे उपचार सुरू असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.