सचिन गाड, मुंबई
Mumbai News: मुंबईतल्या वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये (Worli BDD Chawl) पालिकेने शाळांचे (BMC School)वर्ग चालविण्यासाठी भाड्याने घेतले होते. हे वर्ग परस्पर विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीडीडी चाळ क्रमांक 100 आणि 84 मधील सहा वर्गखोल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी 6 व्यक्तींना परस्पर हस्तांतरित केल्या. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात (Worli Police Station)s या सहा अधिकाऱ्यांसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अधिकाऱ्यांनी पालिकेचे हे वर्ग हस्तांतरित करण्यासाठी खोटी प्रतिज्ञापत्रे, खोटे रेशनकार्ड, खोट्या सह्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन अधिकारी आणि ज्यांच्या नावावर वर्गखोल्या हस्तांतरण करण्यात आल्या ते 6 जण असे मिळून एकूण 9 जणांविरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण समोर येताच पालिकेने घेतल्या वर्गखोल्या ताब्यात घेतल्या आणि हस्तांतरणाची ऑर्डर देखील रद्द केली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भाडेतत्वावर ताब्यात असलेल्या बीडीडी चाळ क्रमांक 100 मधील खोली क्रमांक 6 आणि 7 आणि बीडीडी चाळ क्रमांक 84 मधील खोली क्रमांक 61 ते 64 अशा एकूण 6 वर्गखोल्या हस्तांतरित करण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी 2019 ला प्रकरण समोर येताच पालिकेने वर्ग खोल्या ताब्या घेतल्या. बेकायदेशीर पद्धतीने शासनाची परवानगी न घेता त्यांच्या पदाचा गैरवापर करुन शासनाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन करत आणि शासनाची फसवणूक करुन स्वतःच्या आर्थिक लाभापोटी हे वर्ग हस्तांतरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी कार्यकारी अभियंता तथा तत्कालीन संचालक सुधाकर सांगळे, उपविभागीय अभियंता तथा तत्कालीन व्यवस्थापक अनिल कानिटकर, तत्कालीन चाळ अधिक्षक सुशील सोनावणे यांच्यासह सहा व्यक्ती असे एकूण 9 जणांविरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.