
मुंबई मेट्रो लाईन ७ अ चा बोगदा पूर्ण
प्रवासाचा वेळ २ तासांऐवजी ४० मिनिटांत होणार
मेट्रोमुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा
Metro News : मुंबई मेट्रो नेटवर्कच्या विस्तारात एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मेट्रोच्या लाईन ७ अ प्रकल्पांतर्गत बामनवाडी बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. याचा अर्थ अंधेरी (पूर्व) ते सीएसएमआयए म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा भूमिगत बोगदा पूर्ण झाला आहे. या मेट्रो लाईनचे काम झाल्याने प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यासाठी पर्यायी वाहतूक सुविधा उपलब्ध झाली आहे.
मुंबईतील मेट्रो लाईन ७ अ मेट्रो ७ ही दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व अशा प्रकारे थेट विमानतळाशी जोडेल. मुंबई शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे मोठी गैरसोय होते. एअरपोर्ट लाईन मेट्रो आणि बोगद्यामुळे पूर्वी ज्या प्रवासाला तासभर लागायचा तो प्रवास आता काही मिनिटांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
मेट्रो लाईन ७ अ चा बोगदा १.६४७ किलोमीटर लांबीचा आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान अनेक तांत्रिक आव्हानांना सामोरे जावे लागले. सध्याच्या मेट्रो बोगद्याखाली खोदकाम करणे, सांडपाणी वाहिन्यांजवळून मार्गक्रमण करणे आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागात सुरक्षितता राखणे अशी आव्हाने इंजिनिअयरिंग टीमसमोर होती.
मुंबई मेट्रोतील हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मीरा-भाईंदर, दहिसर आणि अंधेरी येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवाशांचा प्रवास तब्बल तासभराने कमी होईल. साधारणपणे गर्दीच्या वेळी अंधेरीहून विमानतळावर पोहोचण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. मेट्रो प्रकल्पामुळे हा प्रवास फक्त ४० मिनिटांमध्ये पूर्ण करता येईल.
'हा बोगदा मेट्रोच्या कार्यक्षमतेचा पुरावा आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक नेटवर्कमध्ये महत्त्वपूर्ण आणि दूरगामी बदल घडतील. लाईन ७ अ अंतर्गत दोन प्रमुख स्थानके बांधली जातील. पहिले स्थानक हे विमानतळ कॉलनी (एलिव्हेटेड स्टेशन) मध्ये आणि दुसरे स्थानक सीएसएमआयए टर्मिनलच्या खाली भूमिगत स्टेशन असेल. ही लाईन २०२६ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल', असे एमएमआरडीएनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.