
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पहिल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी रेल्वेकरता तब्बल २३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. महाराष्ट्रासाठी २३,७७८ कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पीय वाटपाबाबतची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुंबई लोकल सेवेला अधिक सक्षम बनवण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. तसंच गर्दी कमी करण्यासाठी दिवसाला ३०० अतिरिक्त लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, '२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला २३,७७८ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. २००९-१४ मध्ये महाराष्ट्राला देण्यात आलेल्या सरासरी १,१७१ कोटी रुपयांच्या वाटपापेक्षा हे जवळजवळ २० पट जास्त आहे. महाराष्ट्र या वळणावर पुढे आहे कारण रेल्वे, राज्य सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात त्रिपक्षीय करार आहे. ज्याअंतर्गत सर्व प्रकल्पांसाठी राज्य सरकारचा निधी वाटा आरबीआयकडून दिला जाऊन प्रकल्पांची अंमलबजावणी जलद होईल. महाराष्ट्रात, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत १३२ स्थानकांवर पुनर्विकासाचे काम जलद गतीने सुरू आहे.'
रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'महाराष्ट्रात सध्या १,७०,००० कोटी रुपयांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी १७,१०७ कोटी रुपयांचे ३०१ किमी लांबीचे प्रकल्प मुंबईत राबविले जात आहेत. या प्रकल्पांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका, पनवेल-कर्जत डबल लाईन उपनगरीय कॉरिडॉर, ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉर, कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण-कसारा तिसरी मार्गिका, कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका, निळजे-कोपर डबल कॉर्ड मार्गिका यांचा समावेश आहेत.'
तसंच, 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, परळ, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण आणि पनवेल टर्मिनसची क्षमता वाढवली जाणार आहे. विविध रेल्वे अॅप्स एकत्रित करून एक सुपर अॅप विकसित केले आहे आणि त्याचे बीटा व्हर्जन गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. या आर्थिक वर्षात ५० नमो भारत ट्रेन, १०० अमृत भारत ट्रेन आणि २०० वंदे भारत ट्रेन तयार केल्या जातील. सुरक्षा वाढवण्यासाठी १,१६,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.' , असे देखील ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.