Raj Thackeray News: राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राज्यातील राजकारणात मोठा फेरबदल झाल्याचे समोर आले आहे. अजित पवारांनी बंड करत राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-सरकारला पाठिंबा दिला आहे. राज्याच्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरेंनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 'आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे. (Latest Marathi News)
राज्यातील राजकीय घडमोडींवर ट्वीट करत राज ठाकरेंनी भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, 'आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला आहे. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच. तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला'.
'यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.
'बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.