हिंगोली : शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) त्यांच्या दादागिरीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. पीकविमा कंपनी शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करताना बनवाबनवी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच बांगर यांनी कार्यकर्त्यांसह पीकविमा कंपनीच्या कार्यालयात राडा केला. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांनी दम भरत कानाखाली मारण्याची धमकी दिली आणि तीन तास त्यांना थांबवून ठेवले.
आमदार बांगर यांचा मतदारसंघ असलेल्या कळमदूरी व औंढा तालुक्यात पीकविमा कंपनीकडून चुकीचे सर्वेक्षण होत असल्याच्या तक्रारी बांगर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा कृषी अधीक्षकांना आमदार बांगर यांनी लेखी पत्र देऊन संबंधित पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, कृषी विभागाने कोणती कार्यवाही केली नसल्याने, आमदार संतोष बांगर यांनी कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना शिवसेना कार्यालयात बोलावून पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेण्याच्या सूचना दिल्या. (Latest Marathi News)
जोपर्यंत पीकविमा कंपनीचे अधिकारी येणार नाहीत तो पर्यंत तुम्ही शिवसेना कार्यालयातून जाऊ नये असे म्हणत आमदार बांगर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दम देखील भरला. तीन तास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बसवून ठेवल्यानंतरही पिकविमा कंपनीचे अधिकारी येत नसल्याने अखेर आमदार बांगर हे कृषी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन हिंगोली शहरातील पिक विमा कंपनीचे कार्यालय असलेल्या एनटीसी परिसरात पोहोचले.
तिथे संतोष बांगर यांना पाहताच पिक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पळ काढला. मात्र आमदार बांगर यांनी शेतकऱ्यांचा संताप पाहून पिक विमा कंपनीचे कार्यालय लक्ष करत त्या ठिकाणी असलेल्या साहित्याची तोडफोड केली. यानंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना भेटण्यासाठी संतोष बांगर यांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळवला व पिक विमा कंपनीच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या घटनेनंतर पिकविमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली. संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतातील शेतकऱ्यांच्या पिक विमा कंपनीबाबत असलेल्या तक्रारी निकाली काढण्यास सुरुवात केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.