अंधेरी पूर्व मरोळ विजयनगर भागात एमआयडीसी पोलिसांची ड्रग्जविरोधी मोठी कारवाई
घानाच्या नागरिक हेन्री अलमोहकडून २७८.८० ग्रॅम कोकेन जप्त; किंमत १.१५ कोटी रुपये
आरोपीकडून महागडे मोबाईल आणि रोख रक्कमही हस्तगत
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंधित असल्याचा संशय, तपास तीव्र
मुंबईतील अंधेरी पूर्व भागातील मरोळ विजयनगर परिसरात एमआयडीसी पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात मोठी कारवाई करत घाना देशातील एका परदेशी नागरिकाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल २७८.८० ग्रॅम कोकेन जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल १ कोटी १५ लाख १२ हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई ड्रग्सविरोधी मोहीम अंतर्गत एक मोठं यश मानले जात आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हेन्री अलमोह (वय ३४ वर्षे) असून, तो घाना देशाचा नागरिक आहे. पोलिसांनी केवळ कोकेनच नव्हे तर त्याच्याकडून महागडे मोबाईल फोन आणि रोख रक्कम देखील हस्तगत केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्यास होता आणि तो स्थानिक तसेच उच्चवर्गीय पार्टी सर्किटमध्ये कोकेनची विक्री करत असल्याचा संशय आहे.
एमआयडीसी पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर मरोळ विजयनगर परिसरात सापळा रचण्यात आला. आरोपी नेहमी ठराविक वेळेला आणि ठिकाणी ड्रग्सचे व्यवहार करत असल्याची माहिती पोलिसांकडे होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे छापा टाकत आरोपीला रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर कोकेन सापडले. प्राथमिक चौकशीत आरोपीने कोकेन घाना येथून आणल्याचे नाकारले असले तरी पोलिसांना त्याच्या मागे आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीचा मोठा रॅकेट असल्याचा संशय आहे.
या प्रकरणात पोलिस आरोपीची अधिक कसून चौकशी करत असून, मुंबईत आणखी कोण कोण या विक्रीत सहभागी आहेत, त्याचे स्थानिक संपर्क कोणते आहेत आणि कोकेनची डिलिव्हरी कोणत्या ग्राहकांना देण्यात येणार होती याची माहिती जमा करत आहेत. ड्रग्सच्या स्रोताबाबत तपासासाठी पोलिस अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एएनसी) सहकार्याने चौकशी करत आहेत.
एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी सांगितले की, मुंबई पोलिस ड्रग्सविरोधी मोहिमेत अत्यंत गांभीर्याने कार्यरत असून शहरात अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी, असेही आवाहन करण्यात आले.
मुंबईत गेल्या काही वर्षांत ड्रग्सची मागणी वाढल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. विशेषतः उच्चवर्गीय पार्टी, नाईट क्लब्स आणि काही पब्समध्ये कोकेन, एमडी, हेरॉईन यांसारख्या अंमली पदार्थांचा पुरवठा वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अलीकडच्या काळात एनसीबी, एएनसी आणि स्थानिक पोलिस ठाण्यांनी अशा प्रकरणांमध्ये अनेक विदेशी आणि स्थानिक आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मुंबईतील ड्रग्स पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय तस्करीच्या जाळ्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.