
Mhada News : सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी म्हाडाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबईतील म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी लागणार आहे. वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर वरळी, अभ्युदयनगर, कामाठीपुरा, जीटीबीनगर आणि मोतीलालनगर येथील म्हाडाच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी बांधकाम आणि विकास संस्था (Construction & Development Agency) नेमण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत रहिवाशांना येत्या ४ ते ५ वर्षांमध्ये अधिक प्रशस्त आणि सुसज्ज घरे मिळणार आहेत. याशिवाय म्हाडाला १० ते १२ हजार नव्या घरांचा साठा उपलब्ध होईल. परिणामी सर्वसामान्यांसाठी मोठ्या प्रमाणावर घरांची लॉटरी काढणे शक्य होईल.
राज्य सरकारने म्हाडाच्या ताब्यातील वसाहती आणि उपकरप्राप्त इमारतींचा (विशेषतः कामाठीपुरा आणि जीटीबीनगर येथील सिंधी निर्वासित वसाहतींचा) एकत्रित पुनर्विकास करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. प्रकल्पानुसार, मोतीलालनगर व जीटीबीनगरमधील सिंधी वसाहतींसाठी बांधकाम संस्था नेमण्यात आली आहे. कामाठीपुरा आणि अभ्युदयनगर यासाठी अशाच एजन्सींची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. हे सर्व उपक्रम मुंबईतील सामान्य नागरिकांच्या घराच्या स्वप्नांना बळकटी देणारे ठरणार आहेत.
वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर वरळी
वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळी आदर्शनगर येथील म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. बांधकाम संस्था नियुक्त करून या प्रकल्पांतून म्हाडाला सुमारे १,००० ते १,५०० नवीन घरे मिळणार आहेत.
अभुदयनगर
म्हाडा बांधकाम आणि विकास संस्थेमार्फत काळाचौकी येथील अभ्युदयनगरचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून म्हाडाला सुमारे ५०० ते ६०० नवीन सदनिका मिळण्याची शक्यता आहे.
कामाठीपुरा
कामाठीपुराच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने सी अँड डीएसाठी निविदा काढली आहे. ८,००० भाडेकरूंना ५०० चौरस फुटांची घरे, तर ८०० मालकांना ५० चौरस मीटर जागेवर प्रत्येकी एक सदनिका मिळणार आहे. या प्रकल्पातून म्हाडाला ४४ हजार चौरस मीटर क्षेत्र मिळून सुमारे १,००० ते १,२०० घरे उपलब्ध होतील.
मोतीलालनगर
गोरेगाव पश्चिमेतील मोतीलालनगर १, २ व ३ वसाहतींचा पुनर्विकास अदाणी समूहाकडून केला जाणार आहे. या प्रकल्पात ३,७०० रहिवाशांना १,६०० चौरस फुटांच्या सुसज्ज सदनिका मिळणार आहेत आणि म्हाडाला सुमारे ७ ते ८ हजार नवीन घरे मिळणार आहेत.
जीटीबीनगर
जीटीबीनगरमधील ११.२० एकर जागेवरील सिंधी वसाहतीचा पुनर्विकास किस्टोन रिअॅल्टर्सकडून होणार आहे. १,२०० रहिवाशांना ६३५ चौरस फुटांची घरे मिळणार असून, म्हाडाला सुमारे ७०० ते ८०० नवीन घरांचा साठा उपलब्ध होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.