अक्षय बडवे, पुणे, साम टीव्ही प्रतिनिधी
Pune Police, crime News : डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून घरफोडी करणाऱ्या टोळाच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ८६ तोळे सोने, १५० हिरे, ३.५ किलो चांदी, असा कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या वर्षातील पुणे पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे. या चोरांचा तपास घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल ३००० सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी चोरट्याकडून १ दुचाकी वाहन, ०२ पिस्तूल, ०५ जिवंत राऊंड, व घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रेही जप्त करण्यात आली.
गणेश काठेवाडे, सुरेश पवार आणि अजय राजपूत असे तीन अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. त्यांच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून हे आरोपी आधी रेकी करायचे, त्यानंतर संधी साधत डाव टाकायचे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात चोरीच्या घटनाच्या अनेक तक्रारी आल्या, त्यानंतर पोलिसांनी थेट कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या.
पोलिस उपायुक्त (परिमंडळ २) स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पुणे शहरातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना आम्हाला माहिती मिळाली होती की काठेवाडे हा यातील मास्टरमाईंड आहे. त्या अनुषंगाने तपास करत असताना तब्बल ३००० सीसीटिव्हीचे फुटेज तपासून आम्ही त्याला अटक केली. काठेवाडे याच्याकडे सखोल तपास करता त्याने झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जावून रेकी करुन विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण १४ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. स्वतःची ओळख लपविण्यासाठी काठेवाडे हा उच्चभ्रू सोसायटीमध्ये रहात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे"
या घरफोडी प्रकरणात काठेवाडे याचा साथीदार सुरेश पवार याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. या दोघांची ओळख कारागृहात झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर पुण्यातील विविध ठिकाणी घरफोडी करण्याचे दोघांनी ठरवले होते. याच प्रकरणात सोने विक्री करणारा व्यवसायीक अजय राजपूत याला सुद्धा अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणी सखोल चौकशी स्वारगेट पोलिसांकडून सुरू आहे. मुख्य आरोपीकडे झोमॅटो डिलीव्हरी बॉयचे कपडे आढळले आहेत. ते ताब्यात घेण्यात आले आहेत. गणेश काठेवाडे हा मकोका गुन्ह्यामधून जामिनावर सुटलेला असून त्याच्यावर पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण हद्दीमध्ये ५५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
या संपूर्ण गुन्ह्यातील मुख्य आरोपी गणेश काठेवाडे घरफोडी करण्यापूर्वी झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जावून रेकी करायचे, त्यानंतर घरफोडी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे पोलीस सीसीटीव्ही चेक करुन आपल्या पर्यंत पोहचू नयेत, यासाठी तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना सुमारे ४० ते ५० कि.मी. चा प्रवास करायचा. घरफोडी करुन जाताना पुन्हा ४० ते ५० कि.मी. चा प्रवास छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून करुन जात असे. तसेच घरफोडी करुन जाताना व घरफोडी करण्यासाठी येताना स्वतःची ओळख लपविण्यासाठी विविध जॅकेट, केसांचा विग, टोपी परिधान करुन वेशभूषा बदलत असे. चोरीचे दागिने यातून आलेले पैसे त्याने गोवा व इतर ठिकाणी मौजमजेसाठी उडवून काही पैसे शेअर मार्केटमध्ये (इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये) गुंतविल्याचे निष्पन्न झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.