

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये आरपीआयचा मेळावा
महायुतीत एकजुटीची आठवले यांची हमी
'महायुती वेगळी लढली तरी शेवटी सर्व एकत्रच येणार'
ठाकरेंनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारू घेतलाय; आठवलेंचा टोला
अजय दुधाणे, उल्हासनगर | साम टीव्ही
राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील घटकपक्ष नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढले. निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये एकमेकांची उणीधुणी सुद्धा काढली. कोकणात तर राणे विरुद्ध राणे असा संघर्षही बघायला मिळाला. फोडाफोडीचं राजकारणही अनेक ठिकाणी झालं. यामुळं राज्यातही महायुती दुभंगते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. तशी चर्चाही राज्याच्या राजकारणात सुरू होती. पण आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी हा संघर्ष टाळण्यासाठी पुढाकार घेत 'फोडाफोडी बंद'चा मार्ग काढला. आता आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुतीची काय रणनीती असणार आहे याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याचवेळी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या आरपीआय आठवले गटाचे प्रमुख नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीचा महापालिका निवडणुकींसाठीचा असलेला 'सीक्रेट प्लान' फोडला आहे.
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचा कार्यकर्ता मेळावा शहराध्यक्ष नाना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील गोल मैदानात झाला. या मेळाव्यात आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आठवले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, तसेच भाजपचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानीही उपस्थित होते. यावेळी आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, महायुती अखंड राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिथे युती शक्य आहे, तिथे सर्व पक्ष एकजुटीने लढतील. जिथे युती होणार नाही तिथे स्वतंत्र लढले तरी शेवटी सर्व जण एकत्रच येणार आहेत. फक्त वेगवेगळे लढताना एकमेकांवर अनाठायी टीका न करण्याचे निश्चित झाले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत. तसे संकेत उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या व्यासपीठांवर दिले आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महापालिका निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी जड जाईल, असे अनेक राजकीय विश्लेषकांकडून बोललं जात आहे. तर दोन्ही ठाकरे बंधूंवर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून टीका केली जात आहे. रामदास आठवलेंनी देखील ठाकरेंना टोला लगावला आहे.
दोन्ही बंधू एकत्र आले असले तरी त्यांनी आपल्या पायावर स्वतःच धोंडा मारून घेतला आहे. या पावलामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे यश मिळवू शकतील असे वाटत नाही. सत्ता येईल इतकी ताकद त्यांना मिळणार नाही. मात्र मराठी मतांचा काही भाग त्यांच्या बाजूला जाऊ शकतो, असे आठवले म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.