
सुनील काळे, मुंबई | साम टीव्ही
Maharashtra Politics News Update : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, काँग्रेसनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीत पक्षाच्या विरोधात कारवाया करणारे काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यापैकी काही जणांना नोटिसाही पाठवण्यात आल्या आहेत.
विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीनं सरकार स्थापनेसाठी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या दिल्लीत बैठका झाल्या आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रातही बैठका होणार आहेत. सरकारचा शपथविधी येत्या ५ तारखेला होणार आहे.
दुसरीकडे, निवडणुकीत पराभव झालेल्या महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी बैठका घेत, पराभवाच्या कारणांचा शोध आणि पुढील रणनीतीबाबत चर्चांवर भर दिला आहे. त्याचवेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रातील पराभवामुळे कमालीचे नाराज असल्याचे चित्र आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष अॅक्शन मोडमध्ये आला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारी २० पेक्षा जास्त ठिकाणांहून आल्या आहेत. त्यामुळे आता असे पक्षाचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसने पक्षाच्या विरोधात जाऊन बंडखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली होती. आता विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून एक पाऊल पुढे टाकताना काँग्रेसने अशा स्थानिक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.
काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारी महाराष्ट्रातील २० पेक्षा जास्त ठिकाणांहून आल्या आहेत. प्रदेश काँग्रेसनं ही बाब गांभीर्यानं घेतली असून, या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांना नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. आतापर्यंत बंटी शेळके, सूरज ठाकूर यांच्यासह काही जणांना नोटिसाही पाठवल्या आहेत. या नोटिशींना उत्तरं दिली नाहीत, तर कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात भाजपनं जबरदस्त मुसंडी मारली. तर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही घवघवीत यश मिळालं. भाजपनं १३२ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या. महायुतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात जो कधी घडला नाही, तो इतिहास घडवला.
२३० जागा जिंकून एकहाती सत्ता आणली. पण त्या तुलनेत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने २० जागांवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १० आणि काँग्रेसला अवघ्या १६ जागा जिंकता आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.