Navi Mumbai News: नवी मुंबईतल्या खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला आलेल्या श्री सदस्यांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यूचा आकडा आणखी वाढला आहे. आज आणखी एका श्री सदस्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा 14 पोहाचला आहे.
आज श्री सदस्या स्वाती वैद्य (वय 34 वर्ष) यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. स्वाती यांच्यावर वाशीमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. स्वाती या विरार येथील रहिवाशी होत्या.
नवी मुंबईतील खारघर येथे 16 एप्रिल, रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येत श्री सदस्य उपस्थित होते. (Latest News Update)
सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत
भर उन्हात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे अनेक श्री सदस्यांचा उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. यात आतापर्यंत 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक श्री सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे- आप्पासाहेब धर्माधिकारी
आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटलं की, पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे.माझ्या कुटूंबातील सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित झालो आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे.
मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबीयांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.