भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याची जोरदार चर्चा रंगलीय. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्क तर शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा जपताना एकनाथ शिंदेंची कसोटी लागणार आहे.
लोकसभेला चांगली कामगिरी केली असली तरी विधानसभेला किमान 50 जागा जिंकून शिंदेंना आपली ताकद सिद्ध करावी लागणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. शिवसेनेतील फुटीनंतर दसरा मेळाव्याच्या जागेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले होते. त्यानंतर शिंदे गटाने तीन वर्षात दोन वेळा दसरा मेळाव्याचं ठिकाण बदललंय.
2022- शिंदे गटाने बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर मेळावा घेतला
2023- शिंदे गटाने आझाद मैदानावर मेळावा घेतला
2024 - शिंदे गटाने आझाद मैदानावर मेळावा आयोजित केलाय.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदेंनी दिल्ली वाऱ्या करत जास्तीत जास्त जागा मिळवल्या. मात्र आता विधानसभेला शिंदेंची कसोटी लागणार आहे. ती नेमकी कशी? हे जाणून घेऊ.
लोकसभेप्रमाणे विधानसभेला जास्तीच्या जागा मिळवण्याचा प्रयत्न शिंदे गटाचा असणार आहे. लोकसभेप्रमाणे स्ट्राईक रेट वाढवण्याचं आव्हानही शिंदे यांच्यासोबत असणार आहे. शिवसेना फुटीनंतर जनतेचा पाठींबा आपल्यालाच असल्याचं सिद्ध करणं, हे देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. विधानसभेला 50 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं आव्हान शिंदे गटासमोर आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सरकारने निर्णयांचा धडाका लावलाय. त्यामुळे विधानसभेपूर्वी शिंदे दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार? त्याबरोबरच विधानसभेसाठी कोणता बुस्टर डोस देणार? यावरच विधानसभेचं गणित अवलंबून असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.