सचिन जाधव, पुणे|ता. २७ एप्रिल २०२४
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. सोमवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये सभा पार पडणार आहे. पंतप्रधानांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून शहरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा, शहरात निर्बंध..
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे २९ आणि ३० एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे आदेश दिलेत.
या आदेशानुसार, २७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ३० एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे शहर परिसरात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८ च्या दंडनियमानुसार कायदेशीर कारवाई होणार आहे.
पोलिसांचे शहरात कोबिंग ऑपरेशन..
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहे. पोलिसांनी शहरातील हॉटेल, लॉजेस याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कोबिंग ऑपरेशनद्वारे तपासणी केली. तसेच सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉजवर संशयस्पद राहणाऱ्या नागरिकांची पोलीस चौकशी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.