Leopard Threat: बिबट्यांची बकऱ्यांची मेजवानी हुकणार? वनमंत्र्यांचा दावा हास्यास्पद?

Leopard Threat: बिबट्यांची पावलं आता मोठ्या शहरांकडे वळलीयत. थेट पुणे, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूरसारख्या शहरांमध्येही बिबट्यानं धुमाकूळ घातलाय.
pune Leopard
Leopard Attack Saam tv
Published On
Summary
  • बिबट्याच्या दहशतीमुळे गावागावात भीतीचं वातावरण.

  • मेंढपाळ कुटुंबं उघड्या आकाशाखाली रात्री काढण्यास मजबूर.

  • बकऱ्यांवर हल्ले होत असल्याने उपजीविकेवर मोठा परिणाम.

या आईची ही आर्त भावना ऐकून तुमच्या काळजाचं नक्कीच पाणी पाणी झालं असेल, पण ही आहे बिबट्याची दहशत. बिबट्या कधी, कुठून आणि कसा येईल आणि यांच्या चिमुकल्या पोरा-बाळांना उचलून नेईल या भीतीत ही मेंढपाळ उघड्या आभाळाखाली आणि बिबट्याच्या दहशतीखाली आपले दिवस काढतायत. अंधार पडला आणि कुत्रं भुंकलं की रात्रीचा काळोख जीवाला घोर लावतो तो सकाळच्या पहिल्या किरणाचा.

मृत्यूपेक्षा मृत्यूची भीती जास्त भयानक असते आणि दररोज अंधार पडला की हीच भीती घेऊन रात्री जीव मुठीत घेऊन झोपावं लागतं. शेतशिवारातच नाही तर बिबट्याच्या दहशतीने गावागावात नागरिक जीवघेण्या भीतीच्या छायेत जगत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरुर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात शेतात काम करायचं म्हटलं तर चोरांपेक्षा बिबट्याची भीती जास्त झालीय, अशी भावना शेतकरी व्यक्त करताहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे मेंढपाळच नाही तर सर्वसामान्य माणसंही धास्तावलेत.

बिबट्यामुळं मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याचं चित्र आहे. शेतांमध्ये काम करताना बिबट्याची दहशत असली तरी पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळे बिबट्य़ापासून जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आता नवा पर्याय शोधलाय. शेतात काम करताना आता गळ्याभोवती चक्कं काटेरी पट्टा घालायला सुरुवात केलीय.

आता हे चित्र फक्त पुणे जिल्ह्यातील 4 तालुक्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तर बिबट्याने शेतशिवारापासून ते शहरापर्यंत सगळ्यांनाच सळो की पळो करून सोडलंय. फक्त जुन्नर परिक्षेत्रातच 2 हजारपेक्षा जास्त बिबटे आहेत. या बिबट्यांच्या हल्ल्यात 2024 मध्ये 20 तर यंदा तब्बल 68 जणांचा बळी गेलाय. तर 150 पेक्षा जास्त नागरिक जखमी झालेत.

एवढंच नाही तर वर्षभरात 1500 जनावरांचा मृत्यू झालाय. या बिबट्यांची पावलं आता मोठ्या शहरांकडे वळलीयत. थेट पुणे, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूरसारख्या शहरांमध्येही बिबट्यानं धुमाकूळ घातलाय.विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशन सुरु असताना नागपूरमध्येही बिबट्यानं धडक दिली.

त्यामुळेच की सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांना जाग आली आणि याच बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याचे तीव्र पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटलेत. विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला धारेवर धरलं. मात्र वनमंत्र्यांनी थेट बिबट्यांना कोटी रुपयांच्या बोकडांची मेजवानी देण्याचा हास्यास्पद उपाय सांगितला.तर आमदार रवी राणांनी तर रोगापेक्षा इलाज भयंकर सांगून थेट बिबटे पाळण्याचाच सल्ला देत नको ते तारे तोडले. मात्र खरंच 1 कोटी रुपयात किती बकऱ्या मिळतील आणि एका बिबट्याच्या वाट्याला किती बकऱ्या येतील. पाहूयात.

मात्र खरंच 1 कोटी रुपयात किती बकऱ्या मिळतील आणि एका बिबट्याच्या वाट्याला किती बकऱ्या येतील. पाहूयात. बाजारातील एका शेळीची किंमत 12 हजार रुपये आहे. त्यामुळे 1 कोटीमध्ये 834 शेळ्या मिळतील. मात्र राज्यात फक्त जुन्नर तालुक्यातच 2 हजार बिबटे आहेत. त्यामुळे 3 बिबट्यांच्या वाट्याला 1 शेळी येईल.

एकंदरीत आतापर्यंतचा टक्केवारीचा अनुभव पाहता या बिबट्यांपर्यंत किती बोडक पोहचणार आणि बिबट्यांच्या मेजवानीवर वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारीच ताव मारणार असा आरोपही काही नेत्यांनी केलाय. तर सरकार विरोधकांनी एकंदरीत बिबट्याच्या मुद्यावर सरकारच्या क्षमतेवर सवाल उपस्थित केले आहेत.

एका बाजूला बिबट्याच्या मेजवानीचे बेत आखले जात असताना जुन्नर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची समस्या किती तीव्र झालीय याकडे लक्ष वेधण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे चक्कं बिबट्याच्या वेशातच विधानभवनात धडकले.

खरंतर बिबट आणि मानवाचा वाढता संघर्ष टाळण्यासाठी बिबट्यांच्या नसबंदीचा शास्त्रीय पर्याय पुढे आलाय. मात्र हा पर्यायही लालफितीत पडून आहे.. तर आतापर्यंत 91 बिबट्यांना जेरबंद केल्यामुळे सगळेच रेस्क्यू आणि ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर्स फुल झालेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली-25

माणिकडोह बिबट निवारा केंद्र, जुन्नर- 67

गोरेवाडा वन्यजीव रेस्क्यू सेंटर्स, नागपूर- 30

ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर्स नाशिक- 15

एवढंच नाही तर एका बाजूला बिबट्यांसाठी 1 कोटींचे बकरे जंगलात सोडण्याचा दावा वनमंत्री करत आहेत. तर दुसरीकडे रेस्क्यू सेंटर्समधल्या बिबट्यांच्या खाण्याची अबाळ होत असल्याचं चित्र आहे.त्यामुळे फक्त बड्या बड्या बाता मारण्यापेक्षा बिबट्यांचे हल्ले आणि हाल रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. मात्र यासाठी कोणते उपाय करता येतील.. पाहूयात.

कसे रोखाल बिबट्यांचे हल्ले?

बिबट्याने गावात येऊ नये म्हणून गावाबाहेर बांबू किंवा काटेरी झाडांची लागवड

कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करुन बिबट्यांवर लक्ष ठेवणं

गावाबाहेर सौर कुंपण कऱण्याचा पर्याय

बिबट प्रवण भागात नागरिकांना प्रशिक्षण देणं

घराजवळ मोठं गवत, उसाचं पीक घेणं टाळणं

खरंतर बिबट्यानं नागरिकांचं जगणं कठीण केलंय. बिबट्या प्रवण क्षेत्रात दररोज शेतात जाणाऱ्या आईला भीती आहे बिबट्या लेकराला पळवेल याची. तर बापाच्या मनात दहशत आहे बिबट्या कुटुंबाला संपवेल याची. अधिवेशन हे जनतेच्या समस्यांवर ठोस उपाय शोधण्याचं हक्काचं ठिकाण असतं. मात्र बिबट्यावर ठोस उपाय शोधण्याचं सोडून बिबट्या हा सत्ताधारी आणि विरोधकांसाठी केवळ मनोरंजनाचा विषय होता की काय अशी शंका यावी असंच चित्र अधिवेशनात होतं. त्यामुळे यावर सरकार तातडीनं ठोस उपाय शोधणार की बिबट्यांमुळे असेच बळी जात राहणार हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com