kalyan Politics : कल्याणमध्ये विधानसभेसाठी शिंदे गटाकडे इच्छुकांची संख्या वाढली, उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?

kalyan Political News : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. या मतदारसंघातून श्रेयस समेळ यांनीही उमेदावारीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.
 कल्याणमध्ये विधानसभेसाठी शिंदे गटाकडे इच्छुकांची संख्या वाढली, उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
CM Eknath Shinde Saam TV
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे शिंदे गटात कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. आता याच विधानसभा मतदारसंघातून माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनीही मागणी केली आहे. श्रेयस समेळ यांच्या मागणीमुळे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. समेळ यांच्या मागणीनंतर या विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

काही आठवड्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे निवडून आले. तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे परभूत झाले. कल्याण विधानसभा मतदारसंघात महायुतीला १ लाख ५ हजार मत मिळाली. तर महाविकास आघाडीला ७५ हजार मते मिळाली.

या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे पारडे जड आहे. याचदरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात शिंदे गटातील इच्छुक उमेदावारांची संख्या वाढली आहे. शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्या पाठोपाठ कल्याणमधील माजी नगरसेवक श्रेयस समेळ यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त करताना श्रेयस समेळ म्हणाले, आमचं कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आणि समाजकारणात आहे. मी उच्च शिक्षित असून गेली दहा वर्ष नगरसेवक होतो. मागच्या निवडणुकीसही इच्छूक होतो. त्यावेळीही पक्षाला मुलाखत दिली. पक्षाने उमेदवारी भोईर यांना दिली. मला उमेदवारी मिळाली नव्हती, मात्र मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं'.

'यंदाही मी इच्छुक आहे. मुंबईला लागून असलेल्या कल्याणचा विकास व्हायला हवा होता, तितक्या वेगाने विकास झालेला नाही. मागील २५ वर्षात काय झालं, यावर मी बोलणार नाही. मागील वेळीही शिवसेनेकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होतो. उमेदवारीची इच्छा खासदार शिंदे यांच्याकडे व्यक्त केल्याचीही समेळ यांनी सांगितले.

दरम्यान, या विधानसभा मतदारसंघात विश्वनाथ भोईर हे आमदार आहेत. या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढत असल्याने आता शिंदे गटाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, कुणाची समजूत काढतात. उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात घालतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com