अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी
कल्याण : गेल्या अनेक दिवसांपासून कल्याणमधील रस्त्यातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याणमधील रस्त्यातील खड्ड्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या कल्याण शहराचा कारभार हा प्रशासनाच्या हातात आहे. मात्र, प्रशासन लोकांच्या समस्येंकडे दुर्लक्ष करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. प्रशासनाच्या विरोधात मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. कल्याणमधील रस्त्यातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून मनसेने लक्षवेधी आंदोलन केलं आहे.
गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. वारंवार मागणी करून देखील कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाहीत. यामुळे शहरातील रस्त्यातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या विरोधात मनसेने अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं.
कल्याणमध्ये गणेशाची वेशभूषा धारण केलेल्या व्यक्तीसोबत मनसे कार्यकर्त्यांनी खड्डेमय रस्त्याच्या विरोधात आंदोलन केलं. गणरायासोबत कार्यकर्त्यांनी खड्ड्यातच ठाण मांडले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मालवणी भाषेत देवा महाराजा हे गाऱ्हाणे घातले. खड्डे बुजवण्यात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना गणरायाने आता तरी सुबुद्धी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मनसेचे जिल्हाप्रमुख उल्हास भोईर यांच्या नेतृत्वात हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
या अनोख्या आंदोलानाबाबत मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर म्हणाले, ' गणेश विसर्जनासाठी आमच्याकडे गौरीपाडा तलाव आहे. या तलावाकडे जाणारा रस्त्यात भरपूर खड्डे आहेत. या रस्त्यात खड्डा आहे की, खड्ड्यात रस्ता आहे? हे काहीच कळत नाही. यामुळे मनसेने आंदोलन पुकारलं आहे. या तलावात पाच ते दहा हजार गणपतींचे विसर्जन होतात.
'या गौरीपाडा तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा महापालिकेला विसर पडलं आहे. कल्याणमध्ये गणरायाचं याच खड्डेमय रस्त्यातून आगमन झालं आहे. त्यामुळे गणपतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो. मिलिंदनगर ते गौरापाडा तलावाचा रस्ता सुस्थितीत करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.