अभिजीत देशमुख
कल्याणमधील रस्त्यावर लागलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह राजकीय नेत्यांच्या कमानी आज परतीच्या प्रवासाला निघालेल्या बाप्पांच्या मार्गात अडथळा ठरत आहेत. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
गणेशोत्सवामुळे मागचे दहा दिवस घराघरात जल्लोष पाहायला मिळाला. सार्वजनिक गणपती मंडळांमध्येही भक्तीमय वातावरण होतं. मात्र आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे दहा दिवसांच्या गणपतीला निरोप दिला जातोय. तर दुसरीकडे लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेशभक्तांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
मुंबई, पुण्यासह मुंबई उपनगरात सुध्दा गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीये. त्यामुळे राज्यातील विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये आज जल्लोष पाहायला मिळतोय. अशातच कल्याणमधील रस्त्यावर लागलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह राजकीय नेत्यांच्या कमानी आज परतीच्या प्रवासाला निघालेल्या बाप्पांच्या मार्गात अडथळा ठरल्यात. कल्याण दुर्गाडी गणेश घाट परिसरात लागलेल्या नेत्यांच्या बॅनर कमानीमुळे बाप्पा अडकले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय.
गेल्या वर्षी याच ठिकाणच्या कमानी पडल्याने अपघात होता होता राहिला होता. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या मार्गावर अशा प्रकारच्या कमानी लावू नये अशी मागणी नागरिकांसह गणेश भक्तांनी केलीये. तर याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील "हे गणरायाला पुढल्या वर्षी आपल्या आगमनापुर्वीच यांच्या राजकीय मुजोरीचे इथल्याच खाडीत विसर्जन करून इथल्या नागरीकांना सुखाचे व आनंदाचे दिवस दिसू दे" असं ट्विट करत बॅनरबाजी करणाऱ्या राजकीय नेत्यांना टोला लगावलाय.
गणपती उत्सवादरम्यान गणेश मंडळांसह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून भाविकांना शुभेच्छा दिल्या जातात. यंदाही दिल्या गेल्या आहे. मात्र कल्याण मधील दुर्गाडी चौकात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने मोठया कमानी लावल्या आहेत. या कमानीवर महामंडळाचे सदस्य आणि सर्व पक्षीय नेत्यांचे फोटो झळकले आहेत. मात्र या कमानीमुळे वाहन चालकांना त्रास होतोच तसेच बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीला अडथळा निर्माण झाला. या कमानीमुळे विसर्जन करण्यासाठी मूर्त्या कशाबश्या रस्त्याने पुढे काढल्या. मागच्या वर्षी याच ठिकाणी अशाच कमानी पडल्याच्या घडना घडल्या होत्या. काही वाहनांचे त्यामुळे नुकसान झाले होते. ही बाब लक्षात घेता मनसे आमदार राजू पाटील यांनी याकडे लक्ष वेधण्याकरीता ट्वीट केले आहे.
काय केले आहे ट्वीट
"गेल्या वर्षी राजकीय नेत्यांनी लावलेल्या कमानी पडून अपघात झाले होते. परंतु त्यावरून कोणताही शहाणपणा या राजकीय नेत्यांना आणि पालिका प्रशासनाला आला नाही.आता तर थेट बाप्पाच्या मिरवणूकीत अडवणूक या कमानीने करून ठेवली आहे.हे गणराया पुढल्या वर्षी आपल्या आगमनापुर्वीच यांच्या राजकीय मुजोरीचे इथल्याच खाडीत विसर्जन करून इथल्या नागरीकांना सुखाचे व आनंदाचे दिवस दिसू दे.",असं ट्वीटमध्ये म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.