मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेले जेव्हीआरएल-बीकेसी-कफ परेड हे भुयारी मेट्रो ३ मार्गिका सध्या नेटवर्क समस्येमुळे प्रवाशांच्या नाराजीचे कारण बनली आहे. मेट्रोचा संपूर्ण प्रवास मार्ग जमिनीपासून सरासरी १८ मीटर खोल असल्याने मोबाईल नेटवर्क मिळण्यात अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून आता प्रवाशांना भारत सरकारच्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चे नेटवर्क उपलब्ध करून देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने आधी नेटवर्क सुविधा उभारण्यासाठी सौदी अरेबियातील ‘एसेस इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीशी करार केला होता. मात्र, या विदेशी कंपनीकडून नेटवर्क सेवा अपूर्ण राहिल्याने आणि मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी सहकार्य नाकारल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
एमएमआरसीएलमधील सूत्रांच्या मते, रिलायन्स जिओने एसेस इन्फ्राचे ट्रिक वापरून आपली नेटवर्क सेवा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जिओचे नेटवर्क संपूर्ण मार्गिकेत उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे एअरटेलनेही या प्रकल्पातून माघार घेतली आहे. व्होडाफोन-आयडियाचे नेटवर्क सध्या फक्त धारावी ते आचार्य अत्रे चौक या दरम्यानच्या सहा स्थानकांपुरते मर्यादित आहे.
या पार्श्वभूमीवर आता बीएसएनएलला नेटवर्क सुविधा प्रदान करण्यासाठी पुढे येण्याची मंजुरी मिळाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. सध्या प्रवाशांना डिजिटल तिकिटांसाठी विविध अॅप्सचा वापर करावा लागतो, मात्र नेटवर्क नसल्याने तिकीट प्रक्रिया अनेकदा अडखळते. मुंबई मेट्रो ३ ची सर्व स्थानके जमिनीपासून तीन मजले खाली असून तिकीट खिडकी दोन मजले खाली आहे, त्यामुळे सिग्नल मिळणे अधिक कठीण जाते.
या समस्येवर तात्पुरता उपाय म्हणून मेट्रो प्रशासनाने ‘मेट्रोकनेक्टर’ या अॅपच्या माध्यमातून वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तिकीट काढण्यासाठीच्या परिसरात १० मीटर अंतरावर वाय-फाय सिग्नल मिळतात. मात्र, प्रवासादरम्यान सातत्यपूर्ण नेटवर्कसाठी बीएसएनएलची सेवा सुरू होणे हा दीर्घकालीन उपाय ठरेल, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.