
सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
महायुती सरकारने घेतलेल्या मुलींच्या फी माफीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर आले असून, आज त्यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयास अचानक भेट देऊन मुलींच्या फी माफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. तसेच, राज्यातील १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे, यासाठी राज्य सरकारने व्यवसायिक आणि वैद्यकीय शिक्षणाचे शूल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एकूण ८४२ कोर्सेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूद देखील करण्यात आली होती. सदर निर्णयाच्या अंमलबजावणीतील शैक्षणिक संस्थांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी शासनाने दिशानिर्देश देखील जारी केले होते. तसेच, उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरारी पथक नेमून विद्यार्थिनींच्या तक्रारींची दखल घेतली जात होती.
या निर्णयाचा आतापर्यंत किती विद्यार्थिनींना लाभ झाला, याचा प्रत्यक्ष आढावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील घेण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी गरवारे महाविद्यालयास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी थेट महाविद्यालयामधील विद्यार्थिनींशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. त्यामुळे मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने मुलींचे व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षण पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मुलींनी देखील ३१ मार्चपर्यंत महाविद्यालयात शासनाने नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फी माफीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. जेणेकरून मुलींना या निर्णयाचा लाभ घेता येईल. तसेच, विद्यार्थिनींच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासन यांची संयुक्त समिती स्थापन करावी, अशी सूचना यावेळी केली.
दरम्यान, राज्यभरातील शंभर महाविद्यालयांना अशा प्रकारे अचानक भेट देऊन मुलींच्या फी माफीचा आढावा घेणार असून, मुंबईतील वांद्रे येथील थडोमल शहानी महाविद्यालयातून सुरुवात केली असून; पुण्यातील गरवारे दुसरे महाविद्यालय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 'कमवा आणि शिका' तत्वावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा भत्ता वाढविण्याची मागणी काही विद्यार्थ्यांनी यावेळी केली असता; त्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक प्रकाश बच्चाव हे देखील उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.