दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे शहरासह परिसरात बुधवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून पुढील दोन दिवस पुण्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. अनेक सखल भागात पाणी साठण्याची शक्यता असल्याने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी जिल्ह्यातील घाट प्रवण क्षेत्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय.
विशेष बाब म्हणजे, मागील आठवड्यात पुणे शहराला (Pune Rain) मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं होतं. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. शेकडो घरात पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. पूरस्थिती लक्षात घेता शहरात बचावपथकाला पाचारण करण्यात आलं होतं.
अशातच हवामान खात्याने (IMD Rain) पुन्हा एकदा शहराला पावसाचा अलर्ट दिल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, पावसाची संततधार सुरू असल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणातील एकूण पाणीसाठा जवळपास 90 टक्क्यांवर पोहचला आहे.
त्यामुळे पुणेकरांवरील पाणीटंचाईचं संकट दूर झालं असून वर्षभराची चिंता मिटली आहे. आजच्या ताज्या आकडेवारीनुसार, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील एकूण पाणीसाठा 90 टक्के इतका झाला आहे. पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे खडकवासला आणि पानशेत धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.
नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. सध्या पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 81.43 टक्के पाणीसाठा जमा झालाय. तर पानशेत 91.76 टक्के, वरसगाव: 86.75 टक्के आणि टेमघर धरणातील पाण्याची टक्केवारी 88.48 इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.