मुंबईसह उपनगरात शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वांद्रे, दादर आणि वरळी परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. नवी मुंबई तसेच ठाण्यातील काही भागातही पावसाच्या सरी बरसल्या. परिणामी कामावर निघालेल्या नोकरदारवर्गाची पुरती तारांबळ उडाली. दरम्यान, येत्या ३-४ तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दोन दिवस आधीच नैऋत्य मौसमी वारे मुंबईत दाखल झाले होते. मान्सूनचं आगमन होताच मुंबईसह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली.
मात्र, दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे पुन्हा उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली होती. शुक्रवारी पहाटे ढगाळ वातावरण तयार होऊन मुंबईत पुन्हा पावसाचे आगमन झाले. दरम्यान, पुढील ३-४ तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे मुंबईसह पुण्यात पाऊस पडत असला तरी दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्याला अद्यापही पावसाची प्रतिक्षाच आहे. मोसमी वाऱ्यांनी कोकण, मराठवाडा तसेच विदर्भाच्या काही भागात मजल मारली आहे. परंतु बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा वेग मंदावला आहे.
परिणामी संपूर्ण महाराष्ट्राला व्यापण्यास मान्सूनला आणखी काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. २० जूननंतरच राज्यात पावसाचा जोर वाढेल, असं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.