
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना आणखी एक हायवे मिळणार आहे. त्यामुळे नरिमन पॉइंटपासून ते मिरा-भाईंदर प्रवास फक्त अर्धा तासांवर होणार आहे. हा महामार्ग ३ वर्षांत तयार होणार आहे. यासाठी मिठागराची जमीन हस्तांतरित केली जाणार आहे. हा महामार्ग तयार झाल्यानंतर नरिमन पॉइंटवरून मिरा-भाईंदरचा प्रवास कोस्टलमार्गे अर्ध्या तासात करता येईल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
नरिमन पॉइंटवरून मिरा-भाईंदर हा प्रवास करत असताना वाहनचालकांना वाहतूककोंडी, खड्ड्यांसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना पावणे दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. पण आता प्रवाशांचा हा प्रवास फक्त अर्धा तासांवर येणार आहे. त्यामागचे कारण म्हणजे मुंबईत आणखी एक महामार्ग तयार होत आहे. केंद्रीय मिठागार मंत्रालयाने आपली जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केल्यामुळे दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे कोस्टल रोडमार्गे नरिमन पॉईंटवरून मिरा-भाईंदरला सुसाट जाता येणार आहे.
दहिसर ते भाईंदर हा महामार्ग ३ वर्षांत तयार होणार आहे. त्यानंतर नरिमन पॉइंटवरून मिरा-भाईंदरला कोस्टलमार्गे अर्ध्या तासात पोहचता येईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य शासन आणि केंद्रीय मिठागार मंत्रालयाकडे या महामार्गासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर दहिसर- भाईंदर या ६० मीटर रस्त्याच्या मार्गातील ५३.१७ एकर जागा केंद्रीय मिठागार मंत्रालयाने मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यास मंजुरी दिली.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोस्टल रोड हा उत्तनपर्यंत जाणार आहे. तेथून दहिसर-भाईंदर हा ६० मीटर रुंदीचा रस्ता मीरा रोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत येऊन तिथून वसई विरार या दोन शहराला जोडला जाणार आहे. या रस्त्याची निविदा यापूर्वीच काढण्यात आली आहे. या महामार्गाचे काम एल ॲड टी ही कंपनी करणार आहे. पुढील ३ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यासाठी येणारा तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे. कोस्टल रोडचा समुद्र किनाऱ्याला धोका नाही.
कोस्टल रोड हा उत्तन येथून समुद्रकिनाऱ्यावरून विरारकडे जाणार होता. पण त्यामुळे मासेमारीवर आणि पर्यायाने उपजीविकेवर परिणाम होण्याच्या भीतीने त्याला कोळी बांधवांनी विरोध केला होता. प्रताप सरनाईक यांनी कोळी बांधवांची ही व्यथा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडली आणि त्यांच्या मागणीला मान्यता मिळाली.
त्यामुळे हा मार्ग समुद्रकिनाऱ्यावरून जाण्याऐवजी उत्तन ते दहिसर आणि तेथून मीरा-भाईंदरमार्गे वसई विरारकडे जमीनमार्गे जाणार आहे. मार्गातील अडथळा दूर जमिन हस्तांतरीत झाल्याने दहिसर ते भाईंदर आणि पुढे वसई-विरारकडे जाणारा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.