पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' पुस्तकातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं थेट नाव न घेता गंभीर आरोप केले होते. यानंतर मोठी राजकीय खळबळ माजली होती. यातच आज त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणल्या, ''अजित पवार यांनी मला येरवाड्यातील जागा हस्तांतरित करण्यास सांगितलं होतं. पण मी त्यांना नकार दिला होता.'' बोरवणकर म्हणाल्या की, येरवाड्यातील पोलिसांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा आदेश अजित पवारांचा होता.''
पत्रकार परिषदेत बोलताना मीरा बोरवणकर म्हणाल्या की, ''बिल्डर, पोलीस, नोकरशहा यांचे लागेबांधे आहेत. त्यामुळं नागरिकांनाच सतर्क राहावं लागेल. जिथे जिथे प्रायव्हेट बिल्डरला जागा दिली. त्याचा पुम्हा विचार करण्याची गरज आहे.'' (Latest Marathi News)
त्या म्हणाल्या, ''अजित पवार यांच्यासोबत माझी फक्त एक मीटिंग झाली होती. त्यांना मी म्हणाले की, मी हे करणार नाही.'' बोरवणकर म्हणाल्या, ''माझे आयुक्तपद दोन वर्ष होते. मला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मला म्हणाले होते, मला आघाडी धर्म पाळावा लागेल.''
दरम्यान, बोरवणकर यांच्या आरोपावर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''मी बोरवणकर यांचं पुस्तक पाहिलं नाही. मी माध्यमांमधल्या बातम्या पाहिल्या. त्यात येरवड्यातल्या जमिनीबाबत चर्चा आहे. तसंच माझ्या कार्यकाळातला हा विषय नव्हता.''
मॅडम कमिश्नर पुस्तकात अजित पवार यांचं नाव न घेता काय आरोप करण्यात आले आहेत?
या पुस्तकात पोलीस आयुक्तपदी मीरा बोरवणकर असताना त्यांनी 2010 मधील प्रकरणाचा उल्लेख केला आहे. पुण्यातील येरवडा कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरवर दिल्याचा उल्लेख यात आहे. पुस्तकात लिहिलं आहे की, ''एके दिवशी मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला. त्यांनी सांगितले की, पुण्याचे पालकमंत्र्यांना तुम्हाला भेटायचे आहे. येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनी संदर्भातील विषय आहे.''
यात पुढे लिहिलं आहे, ''मी विभागीय कार्यालयातच पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा त्यांच्याकडे होता. त्यांनी मला सांगितले की, या जागेचा लिलाव झालाय आणि जास्त बोली लावणाऱ्यां सोबत तुम्ही जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडा. मी नम्रपणे त्यांना म्हणाले, येरवडा हे मध्यवर्ती ठिकाण असून भविष्यात अशी जागा मिळणार नाही. तसेच मी नुकताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मी सरकारी जमीन खाजगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघितले जाईल. मी यागोष्टीला नकार दिल्यानंतर पालकमंत्री यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलावर भिरकावला.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.