Dombivli News | डोंबिवली : ठाण्याजवळील कळवा येथे धक्कादायक घटना उघड झाली आहे. मदरशामध्ये (Madrasa) शिक्षण घेणारी पाच अल्पवयीन मुले तेथील शिक्षकाच्या मारहाणीला कंटाळून पळाले. ते आपल्या मूळगावी बिहार येथे जाण्यासाठी निघाले होते.
कळवा स्थानकातून कल्याणच्या दिशेने लोकल प्रवास करत असताना हा प्रकार एका महिला प्रवाशाला समजला आणि तिने याची माहिती (Railway Police) रेल्वे पोलिसांना तत्काळ दिली. रेल्वे पोलिसांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात या पाच मुलांना ताब्यात घेत चौकशी केली असता ही धक्कादायक घटना उघड झाली. रेल्वे पोलिसांनी त्यांची रवानगी उल्हासनगर येथील बाल सुधारगृहात केली. डोंबिवली जीआरपीने या प्रकरणी संबधित मदरशामधील दोन शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. याबाबत मात्र रेल्वे पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
१ ऑगस्ट रोजी एका ट्रेनमध्ये पाच अल्पवयीन मुले बसली होती. ही मुले बिहार येथे आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. मात्र लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने या मुलांची चर्चा ऐकली. त्यांच्या चर्चेवरून मुलांसोबत काही तरी गैरप्रकार झाल्याचे महिलेच्या लक्षात आला. तिने तात्काळ रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करत याबाबत माहिती दिली.
डोंबिवली जीआरपीने या पाचही मुलांना तात्काळ डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी विचारणा केली असता, ही सर्व मुले बिहार येथील असून त्यांना पुन्हा आपल्या मूळगावी जायचे होते. त्यांच्या कुटुंबाने त्यांना शिक्षण घेण्यासाठी कळवा येथील मदरशात पाठवले होते, मात्र त्या मदरशामध्ये शिक्षकांकडून त्यांना मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे या मुलांनी तेथून पळ काढला.
रेल्वे पोलिसांनी या मुलांना चाईल्ड वेल्फेअर कमिटीसमोर हजर केले. या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी कळवा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे, अशी माहिती डोंबिवली रेल्वे पोलिसांनी दिली.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.