मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून फुटलेल्या ४० आमदारांना धडा शिकवण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंनी आतापासूनच रणनिती आखण्यास सुरूवात केली असून ४० बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात ४० नवे उमेदवार पुढे आणण्याचा प्रयत्न ठाकरे (Uddhav Thackeray) करणार आहे. (Uddhav thackeray vs Ekanath Shinde)
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना, चार महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणला. महाविकासआघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेतील (Shivsena) तब्बल ४० आमदारांना घेऊन शिंदेंनी थेट गुवाहाटी गाठली. शिंदेंच्या या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळलं.
तेव्हापासूनच शिंदे विरुद्ध ठाकरे असा नवा सत्ता राज्याच्या राजकारणात सुरू झाला आहे. दिवसेंदिवस हा वाद वाढतच चालला असून येत्या काळात हा सत्ता संघर्ष आणखी पेटणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदेंसह ४० आमदारांना शह देण्यासाठी ठाकरेंनी नवी रणनीती आखली आहे.
या ४० आमदारांच्या मतदारसंघात नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार आहेत. उद्धव ठाकरे लोकसभा, विधानसभा, स्थानिक निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. यासाठी ठाकरे यांनी आतापासूनच उमेदवारांची चाचपणी सुरू केली असल्याची माहिती आहे.
त्यामुळे येत्या निवडणुकीत ठाकरेंचे ४० आमदार आणि शिंदेंचे ४० आमदार असा जोरदार सामना रंगण्याची चिन्ह आहेत. दुसरीकडे शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावरून सध्या सुप्रीम कोर्टात राजकीय लढाई सुरू आहे. ही लढाई जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.