मुंबई - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात मुंबईसाठी 5 विभागप्रमुख तर 3 विभाग संघटकाना पक्ष बांधणी करण्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिवसेना पदाधिकारी, पक्षाचे नवनियुक्त सचिव आणि आमदार यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसाठी काही लोकांकडे महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यात दादर-माहीम वडाळा या विभाग क्रमांक 10 मधून गिरीश धानुरकर यांची विभागप्रमुखपदी तर प्रिया गुरव यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हे देखील पाहा -
तर भांडुप विक्रोळी, मुलुंड या विभाग क्रमांक 7 मधून माजी आमदार अशोक पाटील यांची विभागप्रमुखपदी तर राजश्री मांदविलकर यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबूर, सायन, अणुशक्ती नगर विभाग क्रमांक 9 मधून माजी नगरसेवक मंगेश कुडाळकर यांची विभागप्रमुखपदी तर कला शिंदे यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विभाग क्रमांक 12 मधून दिलीप नाईक यांना विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून विभाग क्रमांक 9 येथून अविनाश राणे यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व विभागप्रमुख आणि विभाग संघटकाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. तसेच त्यांना पक्षविस्ताराचे काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, याआधी आमदार प्रकाश सुर्वे यांची मागाठाणे विधानसभा विभागप्रमुखपदी तर आमदार दिलीप लांडे यांची घाटकोपर-असल्फा विधानसभा विभागप्रमुखपदी तर माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची भायखळा विधानसभा मतदारसंघात विभागप्रमुखपदी नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता या नव्याने नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पक्षविस्तारासाठी नवीन बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.