
सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई प्रतिनिधी
Navi Mumbai CIDCO Lottery : सिडकोने गतवर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर माझे पसंतीचे घर म्हणत तब्बल 26 हजार 502 घरांची सोडत काढली होती. मात्र सिडकोच्या माझे पसंतीच्या घराला नागरिकांची नापसंतीच मिळतेय असे चित्र सध्या पहायला मिळतंय. सिडकोची घरे म्हणजेच घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नातील घरे अगदी किफायतशीर किंमती मध्ये उपलब्ध होतील असा नागरिकांचा समज असतो. मात्र यंदा सिडकोने प्रत्येक नोड मधील रेडी रेकनरनुसार घरांच्या किंमती जाहीर केल्याने सिडकोच्या घरांच्या किंमती थेट खासगी विकासाकांच्या घरांच्या किंमती एवढ्या झाल्यात.
दसऱ्याला 26 हजार 502 घरांची लॉटरी जाहीर होताच 1 लाख 60 हजार पेक्षा अधिक नागरिकांनी सिडकोचे घर घेण्यासाठी अर्ज भरले होते. मात्र सिडकोने आपल्या घरांच्या किंमती जाहीर करताच यातील केवळ 22 हजार नागरिकांनीच बुकिंग अमाऊंट भरल्याची माहिती समोर आली आहे. 25 लाखांपासून ते 97 लाखांपर्यंत सिडकोची घरे असून अल्प उत्पन्न गट आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी ही घरे उपलब्ध करुन देण्यात आलीत.
घरांच्या किंमती पाहून अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकालाही घरे घेणे शक्य आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळेच मोठया प्रमाणात जाहिरातबाजी आणि पाच वेळा मुदतवाढ देऊनही माझ्या पसंतीच्या घराला नागरिकांनी मात्र नापसंतीच दर्शवलेली पहायला मिळतेय.
सिडकोनं 26502 घरांसाठी अर्ज करणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील अर्जदारांना 75 हजार रुपये, अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना 1 बीएचके घरासाठी 1 लाख 50 हजार तर 2 बीएचके घरासाठी 2 लाख रुपये बुकिंग शुल्क जमा करायचं होतं. मात्र 26502 घरांसाठी केवळ 22 हजार अर्ज जमा झाले असून नागरिकांनी सिडकोच्या घरांना नापसंती दर्शवलेय. घरांच्या अवाढव्य किंमतीमुळे सिडकोच्या घरांना अल्प प्रतिसाद मिळाला असून आता तरी सिडको आपल्या घरांच्या किंमती कमी करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.