मुंबई : राज्यात ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा निकाली न शकल्यामुळे आरक्षणाशिवायच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर राज्यात ओबीसी समाजात नाराजी पसरली होती. या ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाल्यावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आता राज्यात फडणवीस-शिंदे सरकार आले, त्यामुळे त्यांच्यावर ओबीसी आरक्षणाची अधिक जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी दिली. ( Chhagan Bhujbal News In Marathi )
आज, रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीतर्फे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भुजबळ देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
भुजबळ म्हणाले, 'आम्ही ८-१० महिने ओबीसींची लढाई लढतो आहोत. ओबीसी आरक्षणाला ग्रहण लागलं आहे. मध्य प्रदेशच्या राज्य सरकारला ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची परवानगी मिळाली आहे. आपण सुद्धा ओबीसी आरक्षणासाठी बांठिया आयोग नेमला. त्यांनी चांगलं काम सुरू केलं आहे. त्यांनी मध्य प्रदेश सरकारप्रमाणे डेटा गोळा करून घ्या म्हणून सांगितलं.आम्ही मतदार यादी वरून डेटा गोळा केला. आता हा डेटा बांठिया आयोगाला आठ दिवसांपूर्वी दिला. आता राज्यात फडणवीस-शिंदे सरकार आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर औबीसी आरक्षणाची अधिक जबाबदारी आहे'.
'ओबीसी आरक्षणाची लढाई आता सुप्रीम कोर्टात लढायची आहे. शिंदे-फडणवीस सरकारने ती लढावी. आम्ही योग्य काम केलं, आता नवीन सरकारने योग्य काम करावं. आम्हाला खात्री आहे की आरक्षणासह निवडणुका होतील. सर्व सुधारणा करून डेटा बांठिया आयोगाला दिला आहे. चार-पाच तारखेला हा अहवाल सादर करायचा होता. मात्र, आता राज्यात सत्तापालट झाला आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया नवीन सरकार करेल', असंही भुजबळ म्हणाले.
शिंदे सरकार पाच-सहा महिने टिकेल, मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा : शरद पवार
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने बंडखोरी करत भाजपसोबत राज्यात सत्तेवर स्वार झाले आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यात भाजपप्रणित शिंदे-फडणवीस सरकार विराजमान झालं आहे. राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन तीन दिवस झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. 'राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल, त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा', असं विधान शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.