Chandni Chowk Bridge News: वाहतुकीला अडथळा असलेला पुण्यातील (Pune) चांदणी चौक हा पूल आज, २ ऑक्टोबर रविवारी मध्यरात्री १ वाजता ब्लास्ट करुन पाडण्यात आला. या ब्लास्टमध्ये पूल (Bridge) पुर्णपणे पडला नव्हता. ब्लास्ट केल्यानंतर पुलाचा इतर भाग हा १० जेसीबी मशिन्स लावून पाडण्यात आला. आता याठिकाणी पूलाचा कचरा (garbage) हटवण्याचे काम सुरू असून सकाळी आठ वाजेपर्यंत वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. (Pune Latest News)
पूल ब्लास्ट करतानाचा व्हिडिओ -
मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात आला आहे. सदर पूल एक व दोन ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात आला. त्यासाठी दुपारी ४ वाजल्यापासून चांदणी चौक परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले होते.
चांदणी चौकातील पूल नियंत्रित स्फोटकांद्वारे पाडण्यात आला. या कामाच्यावेळी तसेच तेथील राडारोडा उचलण्याची कार्यवाही होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली होती. तसेच पूल (Bridge) पाडण्यासाठी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चांदणी चौक परिसरात सायंकाळी कलम १४४ लागू करण्यात होते. सोबतच रात्री ११ वाजण्याच्या आधी सर्व परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. मध्यरात्री १ वाजता हा पूल ब्लास्ट करण्यात आला, पण पूल पुर्णपणे पडला नाही.
जेसीबीच्या साहाय्याने पूल पाडतानाचा व्हिडिओ -
चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी या स्फोटाचे मुख्य इंजिनिअर आनंद शर्मा यांनी माहीती दिली की, जिथे जिथे आम्ही स्फोटके लावली होती, त्या ठिकाणांहून पूलाचे स्ट्रक्चर जमीनदोस्त झाले आहे. यामधील स्टीलचे रॉड आहेत ते खाली आहेत. पूलाच्या मधला जो एक खांबाचा देखील स्फोट झाला असून तो अद्याप खाली आलेला नाही. पण जेव्हा या खांबाचं कॉंक्रीट दूर केलं जाईल तेव्हा तो पूर्णपणे खाली कोसळेल. या पूलामध्ये स्टील जास्त असल्यानं तो दोन्ही बाजूनं दगडांवर ठेवण्यात आल्यानं पूलाचा भाग पूर्णपणे पडलेला नाही. पण जसा स्फोटं होणं अपेक्षित होतं तसा स्फोट झालेला आहे असं शर्मा म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, जे मोठं स्ट्रक्चर असतं त्यामध्ये एक्स्प्लोजन अर्थात मोठा स्फोट केला जातो पण हा कमी तीव्रतेचा स्फोट आहे, याला ब्लास्टिंग म्हणतात. ब्लास्टिंगमध्ये कॉंक्रीट हटवलं जातं, स्टीलच्या फ्रेमवर हे कॉंक्रीट ठेवण्यात आलं आहे. यापुढे चार ते पाच तासांत हे संपूर्ण स्ट्रक्चर खाली घेतलं जाईल. यामध्ये जे १३०० स्फोटकं लावण्यात आले होते, ते सर्व ब्लास्ट झालेले नाहीत. त्याची आम्ही तपासणी करणार आहोत. एनडीएच्या बाजूला काही होल मिस झाले आहेत. पूलाचं स्ट्रक्चर आता पोकलेनच्या सहाय्यानं पूर्णपणे पाडण्यात येईल, असंही आनंद शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.
• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात आली.
• साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात आली.
• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतूकीस बंदी करण्यात आली.
• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजून सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूक बंद करण्यात आली होती.
पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली गेली. १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले होते.
यावेळी सुरक्षेची खबरदारी म्हणून, सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण ३ पोलीस उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ४६ सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच ३५५ पोलीस कर्मचारी असे एकूण ४२७ पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त् करण्यात आले होते.
१२.४५ मिनिटांनी पोलीस प्रशासनाने पुलाच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर निर्मनुष्य केला.
१२.५० वाजता पोलिसांकडून पुन्हा एकदा अलर्ट.
१२.५५ अधिकाऱ्यांकडून शेवटची पाहणी.
मध्यरात्री ०१.०० वाजता ब्लास्ट करण्यात आला
ब्लास्ट झाल्यानंतर पूल फक्त 50 टक्के कोसळला
मात्र त्यानंतर जवळपास दहा जेसीबींच्या साहाय्याने बाकीचा पूल पाडण्यात आला
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.