हिरा ढाकणे, साम टीव्ही, प्रतिनिधी
वर्षानुवर्षे ठाणेकरांना प्रतीक्षा असलेल्या ऐतिहासिक ठाणे अंतर्गत अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततचा पाठपुराव्यामुळे या योजनेला मंजुरी मिळाली असून लवकरच ही महत्वाकांक्षी योजना मार्गी लागणार आहे. दरम्यान अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा ठाणे शहरासाठी ऐतिहासिक प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतुकोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असून पायाभूत सुविधांच्या बाबतीत हे शहर सुसज्ज शहराच्या यादीत झळकणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यामुळे ठाणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.
सुमारे १२, २०० कोटी रुपयांच्या आणि २९ किमी अंतराच्या या प्रकल्पात २२ स्थानके आहेत. या प्रकल्पामुळे मूळ ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत मिळणार आहे. नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरी पाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत या भागातून ही रिंग मेट्रो रेल्वे जाणार आहे.
हा महत्वाकांक्षी प्रकल्प महामेट्रोच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून त्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकार समसमान निधी उभारणार आहेत. या प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून साधारणतः सन २०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचा लाभ अंदाजे ६.४७ लाख प्रवाशांना मिळणार आहे.
हा प्रकल्प ठाणे शहरासाठी ऐतिहासिक निर्णय आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासन यांच्यातील समन्वयामुळे या प्रकल्पाला वेग येईल. या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय शहरे विकास मंत्री मनोहरलाल खट्टर, तत्कालिन केंद्रीय शहरे विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे आभार मानले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.