Ulhasnagar News : सिंघम बनायचं असेल तर धर्मांतर करणाऱ्यांना पकडा; नितेश राणे पोलिसांवर भडकले

धर्मांतराची तक्रार करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोप करत नितेश राणे यांनी पोलिसांवर चांगलीच आगपाखड केली.
Mla Nitesh rane
Mla Nitesh rane Saam Tv
Published On

उल्हासनगर : पोलिसांना सिंघम बनायचं असेल, तर जे धर्मांतर करतात, मुलींना पळवून नेतात त्यांना पकडा, असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) पोलिसांवर चांगलेच भडकले. धर्मांतराची तक्रार करण्यासाठी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गेलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आणि गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करत नितेश राणे यांनी पोलिसांवर चांगलीच आगपाखड केली. (Nitesh Rane News Today)

Mla Nitesh rane
High Court : पुराव्याशिवाय नवऱ्याला दारूडा म्हणणे क्रूरता; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

उल्हासनगरमध्ये एका धर्माच्या २६ वर्षीय तरुणाने दुसऱ्या धर्मातील एका २४ वर्षांच्या तरुणीला पळवून नेल्याची घटना घडली होती. एका दुकानात एकत्र काम करत असताना या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र घरच्यांचा संभाव्य विरोध लक्षात घेत हे दोघे पळून गेले. याप्रकरणी ८ ऑक्टोबर रोजी उल्हासनगर पोलीस (Mumbai Police) ठाण्यात सदर तरुणी हरवल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती. ही तरुणी या तरुणासोबत आधी केरळ आणि तिथून पश्चिम बंगालला गेली. (Ulhasnagar News Today)

याबाबतची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी थेट पश्चिम बंगाल गाठत वीरभूम जिल्ह्यातील नानूर इथे जाऊन या तरुण आणि तरुणीची भेट घेतली. यावेळी आम्ही लग्न करणार असून आम्हाला परत येण्याची इच्छा नसल्याचं जबाब या मुलीने पोलिसांना दिला. ही मुलगी सज्ञान असल्यामुळे पोलीस तिच्या इच्छेविरुद्ध तिला परत आणू शकले नाहीत. याबाबत उल्हासनगरातील भाजप आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, तसंच कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आरोपीसारखी वागणूक देत मारहाण करत त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्याची धमकी त्यांना दिली, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला. या प्रकारानंतर नितेश राणे यांनी आज उल्हासनगर पोलीस ठाण्यात येत सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश फुलपगारे यांची भेट घेतली.

Mla Nitesh rane
Mumbai : आम्ही भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्हीही.., 'त्या' ट्विटवरून मनसेचा इशारा

या भेटीत नितेश राणे यांनी पोलिसांवर चांगलीच आगपाखड केली. तक्रार करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल करत नितेश राणे हे अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. मात्र पोलिसांकडून त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे नितेश राणे यांनी आता या अधिकाऱ्यांविरोधात थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं.

अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होऊन त्यांना शिक्षा व्हावी यासाठी आपण वरपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितलं. तसंच पोलिसांना सिंघम बनायचं असेल, तर जे धर्मांतर करतात, मुलींना पळवून देतात त्यांना पकडा, असंही नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, या सगळ्याबाबत उल्हासनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांना विचारलं असता, नितेश राणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याबाबत विचारणा करण्यासाठी आमच्याकडे आले होते आणि आम्ही त्यांना योग्य ती माहिती दिली आहे, असं म्हणत राठोड यांनी या प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलं.

आमदार नितेश राणे हे पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. उल्हासनगर आणि कल्याण शहरात मुलींना पळवून नेण्याची आणि धर्मांतराची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून त्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावं. तसंच आमचे कार्यकर्ते हे धर्मांतराच्या विरोधात भूमिका घेत असून मुलींना धर्मांतर करण्यापासून वाचवत आहेत.

ते कुठेही चोऱ्या, पाकीटमारी करत नाहीत त्यामुळे त्यांना सुद्धा पोलिसांनी योग्य वागणूक द्यावी, असंही नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं. या सगळ्यानंतर धर्मांतराचा मुद्दा मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे आता कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते? हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com